मागच्या अकरा वर्षांपासून केंद्रातील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने मागच्या काही काळापासून सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसने राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलं आहे. गुजरातमधील साबरमती नदीच्या किनारी आजपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होईल. या बैठकीमध्ये पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
आगामी काळात देशातील काही राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामध्ये प्रियंका गांधी यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, प्रियंका गांधी यांना एक विशिष्ट्य भूमिका दिली जाऊ शकते. त्यामधून त्यांचा राजकीय अनुभव आणि जनतेशी असलेला जवळील पक्षासाठी उपयुक्त ठरू शकतो. दरम्यान, काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी अहमदाबाद येथे आलेले पक्षाचे नेते शशी थरूर यांनी सांगितले की, आम्ही देशाच्या वर्तमान परिस्थितीचा सामना करण्यासाठी रणनीतीवर चर्चा करू.
गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसच्या दोन दिवसीस अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. सरदार स्मारक शाहीबाग येथे ११ वाजल्यापासून काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीला सुरुवात होईल. संध्याकाळी ५ वाजल्यापासून साबरमती नदीच्या किनारी रिव्हरफ्रंट इव्हेंट सेंटरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होईल. यामध्ये मल्लिका साराभाई आणि इतर कलाकार कला सादर करतील.
तर अहमदाबादमधील काँग्रेसच्या या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी अधिवेशन होईल. ९ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून अहमदाबादमधील साबरमती नदीच्या किनाऱ्यावर राष्ट्रीय अधिवेशनाची सुरुवात होईल. या अधिवेशनाला काँग्रेसकडून न्याय पथ असं नाव दिलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे तब्बल ६४ वर्षांनंतर गुजरातमध्ये काँग्रेसचं अधिवेशन होत आहे.