Navjot Singh Sidhu: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष देशभरात मोठ्या प्रमाणात सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. रॅली, सभा यांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली जात आहे. भाजपाचा पराभव करण्याचे मोठे आव्हान इंडिया आघाडीने उचलले आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला धूळ चारण्याचा भाजपाने चंग बांधला आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबमधील एका रॅलीत बोलताना विरोधकांच्या इंडिया आघाडीबाबत मोठा दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये विकास क्रांती रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. याचवेळी नवज्योत सिंग सिद्धू यांनी एका रॅलीला संबोधित केले. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीचा भाग असलेल्या आम आदमी पक्षावर आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. तसेच पंजाबमधील भगवंत मान सरकावर हल्लाबोल केला.
पंजाब जनतेला दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत
सरकार स्थापन करताना सत्ताधारी पक्षाने जनतेला जी आश्वासने दिली होती, ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत, असे सांगत निशाणा साधला. तसेच काँग्रेसचा पंजाबमध्ये पराभव झाला, यासाठी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. अमरिंदर सिंग आता भाजपसोबत आहेत. नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. ही गोष्ट कायम ठेवावी, असे त्यांना सांगितले होते. लोकांसाठी काम करणारे नेते म्हणून इतिहासात आपली नोंद होईल, असे कर्म करायला हवे. पण, आता ते कुठे आहेत? त्यांना पक्षाने दूर केले, अशी टीका नवज्योत सिंग सिद्धू यांनी केली.
दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांनी चरणजीत सिंग चन्नी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. तुम्ही निवडणूक काळात झोकून देऊन काम करायला हवे, असे त्यांना म्हटले होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. जनतेसाठी कामे केली नाहीत आणि आज त्याचे जे काही परिणाम आहेत, ते पंजाब जनतेच्या समोर आहेत, असे नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले.