काँग्रेस-राष्ट्रवादीचे अखेर जुळले; दोन्ही पक्ष लढवणार प्रत्येकी २४ जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 06:10 AM2019-01-04T06:10:58+5:302019-01-04T17:50:00+5:30
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभेच्या जागांबाबत समझोता झाला असून, त्यानुसार दोन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी २४ जागा येणार आहेत.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभेच्या जागांबाबत समझोता झाला असून, त्यानुसार दोन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी २४ जागा येणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेमध्ये हा निर्णय झााला. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनाही माहिती दिली गेली.
काँग्रेसच्या कोअर समितीच्या बैठकीत या समझोत्यावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस स्वत: २६ जागा लढवू इच्छित होती आणि राष्ट्रवादीला २२ जागा देण्याचीच त्या पक्षाची तयारी होती. मात्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे वाद संपवण्यासाठी जागावाटपाचे सर्वाधिकार शरद पवार यांना देण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या पाच महिन्यांत पवार व राहुल गांधी यांची चार वेळा भेट झाली होती.
भाजपाविरोधी पक्षनेत्यांची बैठक
शरद पवार यांच्या दिल्लीतील गुरूद्वारा रकाबगंज मार्गावरील निवासस्थानी गुरुवारी देशातील समविचारी पक्षांच्या नेत्यांचीही
बैठक झाली. या बैठकीला प्रफुल पटेल, सुप्रिया सुळेंसह काँग्रेसचे अहमद पटेल, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, माकपचे नेते सीताराम येचुरी, बसपाचे सतीश मिश्रा, सपाचे राम गोपाल यादव, जया बच्चन, तृणमूलचे डेरेक ओब्रायन, भाकपचे डी. राजा, राजदच्या मिसा भारती आदी अनेक नेते उपस्थित होते.
भाजपाविरोधात पुरोगामी व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्यावर तिथेही एकमत झाले. मात्र त्यास महागठबंधन वा महाआघाडी म्हणण्यास या नेत्यांनी सध्या तरी नकार दिला आहे.
इतर पक्षांना देणार आपल्या वाट्यातील जागा
शरद पवार हे महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टी (आंबेडकर गट), माकप, बहुजन विकास आघाडी, शेकाप, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याशी आघाडीसंदर्भात चर्चा करीत होते.
आपल्या वाट्याला ज्या जागा आल्या आहेत, त्यातून दोन्ही पक्षांनी इतरांना कोणत्या जागा सोडायच्या हे ठरवायचे आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी समझोत्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, आता केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.