नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद म्हणजे काँग्रेसमधील इंदिरा गांधी यांच्या काळापासून असलेले ज्येष्ठ नेते. परंतु आज आझाद यांचा समावेश पक्षात असंतुष्ट नेत्यांमध्ये केला जातो. भाजपच्या आक्रमक राजकारणाला तोंड द्यायचे असेल तर पक्षाला आता अल्प आणि दीर्घ मुदतीचे नियोजन करावे लागेल. त्यानुसार नेत्यांची जडणघडण करावी लागेल. थेट लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जमिनीवरील संघटना मजबूत करण्यावर भर द्यावी लागेल, असे मत गुलाम नबी आझाद यांनी ‘लोकमत’चे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. (Congress needs strong organization to reach out to the people, exclusive interview with senior leader Ghulam Nabi Azad)
आपल्या मुलाखतीत आझाद यांनी एकेकाळी पक्षात युवक काँग्रेसला कसे महत्त्व होते याच्या आठवणी जागवल्या. १९७५ च्या आसपास पक्षात एक काळ असा होता की, नेते पक्ष सोडून गेले होते परंतु कार्यकर्ते पक्षात कायम होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
एकदा पक्षनेतृत्वाला पूर्वकल्पना देऊन पत्नीसह युरोप आणि मॉस्कोच्या दौऱ्यावर गेलो असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मध्येच परत बोलावून घेतले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात आपला समावेश करून घेतला, हा प्रसंगही त्यांनी या मुलाखतीत विशद केला.
गुलाम नबी आझाद म्हणाले की, तेव्हा असलेल्या आव्हानांची तुलना आजच्या दिवसांशी करता येणार नाही. सध्या एकमेकांशी संपर्काचा जमाना असल्याने ट्विटर, फेसबुक, एसएमएस आदी त्यासाठी पूरकच आहे परंतु पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष गावात जाऊनच काम करावे लागेल.