Jyotiraditya Scindia slams Congress, Jammu Kashmir Assembly Election Result 2024: जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने मोठे यश मिळवले. तब्बल १० वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने एकहाती विजय मिळवला. तर गेल्या निवडणुकीपर्यंत जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या पीडीपीला यंदाच्या निवडणुकीत आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागला. नॅशनल कॉन्फरन्सने बाजी मारत ४२ जागा जिंकल्या. तर भाजपा २९ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची आघाडी होती. त्यात काँग्रेसला केवळ ६ जागा जिंकता आल्या. काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला टोला लगावला.
"जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस पार्टी केवळ ६ जागांपुरती मर्यादित राहिली आहे. गेल्या वेळी त्यांना १२ जागा होत्या, आता केवळ ६ जागा मिळाल्या आहेत. ज्या काँग्रेस पक्षाने प्रत्येक राज्यात विविध मित्रपक्षांना एकत्र घेऊन इंडिया आघाडी केली आहे, त्याच मित्रपक्षांना आता काँग्रेसचं ओझं होत आहे हे सत्य आता काँग्रेसला स्वीकारावेच लागेल. जम्मूमध्ये काँग्रेसने २९ जागा लढवल्या त्यापैकी केवळ १ जागा जिंकली. म्हणजेच विजयाची टक्केवारी केवळ साडेतीन टक्के आहे. भाजपाने जम्मूमध्ये ४३ जागा लढवल्या आणि २९ जागा जिंकल्या. म्हणजे भाजपाच्या विजयाची टक्केवारी ७० टक्के आहे," अशा शब्दांत ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
"संपूर्ण राज्याबाबत बोलायचे झाल्यास नॅशनल कॉन्फरन्सने जरी जास्त जागा जिंकल्या असल्या तरीही मतांची टक्केवारी भाजपाच्या पारड्यात जास्त आहे. भाजपाने एकूण मतांपैकी ३६ टक्क्याहून अधिक मते मिळवली आहेत. तर नॅशनल कॉन्फरन्सच्या झोळीत २३ टक्क्यांहून थोडी जास्त मते आली आहेत. जास्त मते भाजपाला मिळाली आहेत. तसेच हरयाणातही भाजपाने दमदार कामगिरी करत सत्ता मिळवली. लोकशाहीप्रधान राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळणे ही मोठी गोष्ट आहे. भाजपाने ते शक्य करुन दाखवले आहे," असेही ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.