Mallikarjun Kharge Sonia Gandhi, Congress: काँग्रेस पक्षात नव्या युगाची सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्षाला २४ वर्षांनंतर बिगर-गांधी अध्यक्ष मिळाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचे प्रमुख म्हणून निवडून आलेले मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम काँग्रेस मुख्यालयात झाला. या वेळी कार्यक्रमात पक्षाच्या दीर्घकाळ अध्यक्षा राहिलेल्या सोनिया गांधी, वरच्या फळीतील नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे औपचारिकपणे काँग्रेसची जबाबदारी सोपवल्यानंतर सोनिया गांधी यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना पक्षापुढील आव्हानांवर चर्चा केली आणि नवीन अध्यक्षांचे अभिनंदन केले. यावेळी खर्गे यांनी सोनिया गांधींच्या एका विधानाशी फारकत घेत, असं घडणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितले.
काय म्हणाल्या सोनिया गांधी?
मल्लिकार्जुन खर्गे यांना अध्यक्षपद मिळाल्याने मला दिलासा मिळाला आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहकार्याबद्दलही आभार मानले. "काँग्रेस पक्षाच्या भल्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम केले आहे. मला तुमच्याकडून मिळालेल्या सर्व प्रकारच्या समर्थनाबद्दल मी कृतज्ञ राहीन. सध्याचा काळ आणि पक्षापुढील आव्हाने याचा गांभीर्यपूर्वक विचार केला जायला हवा. आज पक्षासमोर देशाच्या लोकशाहीबाबत अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांमधून यशस्वीपणे मार्ग काढायचा आहे," असे सोनिया गांधी म्हणाले.
सोनिया गांधीनी केलं खर्गेंचे कौतुक!
"याआधीही काँग्रेस पक्षाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता. त्यातून पक्ष यशस्वीपणे बाहेर पडला. आज मात्र काँग्रेस अध्यक्षपद खर्गे यांच्या हातात असल्याने मी जबाबदारीतून मुक्त झाले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष एकजूट होऊन पुढील आव्हानांवर मात करेल, याची मला खात्री आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मला नेहमीच कौतुक वाटते त्यांची नेतृत्वक्षमता देखील उत्तम आहे", अशा शब्दांत सोनिया यांनी खर्गे यांचे कौतुक केले.
खर्गे यांचं सोनियांना रोखठोक उत्तर
कार्यक्रमाला संबोधित करताना जेव्हा सोनिया गांधी म्हणाल्या की, आज खर्गे पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर मी जबाबदारीतून मुक्त होत आहे. मला खूप दिलासा मिळाला आहे. तेव्हा स्टेजवर बसलेल्या मल्लिकार्जुन खर्गे पटकन म्हणाले, "सोनिया जी, असं अजिबात घडणार नाही. आम्ही तुम्हाला जबाबदारीतून मुक्त करणार नाहीत. तुम्ही विश्रांती घ्या, आराम करा. पण वेळ प्रसंगी आम्ही तुमचे मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्हाला त्रास देत राहू." त्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून खर्गेंच्या विधानाला दुजोरा दिला.