बंगळुरू - नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाचही राज्यांत मिळून काँग्रेसला ५० ते ६० जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, या पाच राज्यांतील पराभवाचा धक्का ताजा असतानाच काँग्रेसला कर्नाटकमध्ये मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी. एम. इब्राहिम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कर्नाटक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद न दिल्याने नाराज असलेल्या इब्राहिम यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे सोपवला आहे.
कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सी. एम. इब्राहिम यांनी सोनिया यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये सांगितले की, गेल्या १२ वर्षांमध्ये पक्षातील समस्यांबाबत मी तुम्हाला अनेक पत्रं लिहिली आहेत. त्यांचे उत्तर देताना तुम्ही समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाय केले जाती, असे आश्वासद दिले होते. मात्र आतापर्यंत मला कुठलाही बदल दिसला नाही. त्यामुळे मी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व तत्काळ प्रभावाने सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौड यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सी.एम. इब्राहिम केंद्र सरकारमध्ये नागरी हवाई वाहतूक मंत्री होते. २००८ मध्ये त्यांनी सिद्धारामय्या यांच्यासोबत जेडीयू सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र गेल्या काही काळापासून ते काँग्रेस आणि सिद्धारामय्या यांच्यावर नाराज होते.
कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर निवड होईल, असे त्यांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही. काँग्रेसने त्यापदावर बी. के. हरिप्रसाद यांची निवड केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले होते. ते म्हणाले की, सिद्धारमैय्यांसाठी आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी काँग्रेसमध्ये आलो होतो. मात्र आता काँग्रेस माझ्यासाठी बंद आध्याय बनला आहे.
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी त्यांना कर्नाटक विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त न करण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित केला. त्यांनी लिहिले की, कर्नाटक विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी निवडणूक झाली असती, किंवा पक्षाच्या सर्व आमदारांचे मत जाणून घेतले असते, तर निश्चितपणे माजी निवड झाली असती. माझ्या पक्षामध्ये १८ सदस्य होते. पण पक्षाने बी. के. हरिप्रसाद यांची निवड केली, ते माझ्यापेक्षा खूप कनिष्ठ आहेत.