- शीलेश शर्मा नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ मंगळवारी रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या भोजनास काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना आमंत्रित न केल्यावरून काँग्रेस एवढा नाराज आहे की त्याला हे ठरवता येत नाही की या भोजनात सहभाग घ्यावा की नाही?काँग्रेस हा संदेशही देऊ इच्छितो की, विदेशी पाहुण्याच्या सन्मानार्थ दिलेल्या भोजन समारंभावर काँग्रेसचा बहिष्कार आहे. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, भोजन समारंभात भाग घ्यायचा नाही, असे आम्ही ठरवले आहे. कारण आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना सरकारने या समारंभाचे निमंत्रण पाठवलेले नाही.माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांना निमंत्रण दिले गेले आहे. उच्च पदस्थ सूत्रांनुसार हे दोघे नेते भोजनात सहभागी व्हायला तयार आहेत म्हणजे हा संदेश देऊ शकतील की, काँग्रेसचा हेतू भोजन समारंभावर बहिष्कार घालण्याचा नाही. परंतु, पक्षाने अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हे दोघेही नेते संभ्रमात आहेत की, त्यांनी भोजनात आम्ही सहभागी आहोत अशी स्वीकृती सरकारला पाठवावी की नाही.सोमवारी रात्री उशिरा काँग्रेस अध्यक्ष वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर हे अंतिम रुपात हे स्पष्ट होईल की डॉ. मनमोहन सिंग आणि गुलाम नबी आझाद भोजनात सहभागी होतील की नाही. सरकारने मर्यादित संख्येतच विरोधी पक्ष नेत्यांना या भोजनासाठी बोलावले आहे.परंतु, उद्योग जगत आणि प्रसारमाध्यमातील अनेक ख्यातकीर्त लोकांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यांच्याकडून स्वीकृतीही राष्ट्रपती भवनला मिळालेली आहे. ज्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले गेले आहे त्यात तेलंगणचे के. चंद्रशेखर राव यांच्यासह भाजपच्या काही मुख्यमंत्र्यांचाही सहभाग आहे.