काँग्रेस पक्षात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, असे असतानाच काँग्रेसमधील नेत्यांचे पलायन सुरूच आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्ष आपल्या नेत्यांचे पलायन रोखण्यात अयशस्वी ठरताना दिसत आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल.
आता सिब्बल यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. सिब्बल यांच्याशिवाय संघटनेतील वरिष्ठ पदावरील अनेक नेत्यांनीही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक राज्यांमधील पक्षांतर्गत संघर्ष, हे या मागचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही महिन्यांत पक्षाच्या हायकमांडवर जोरदार टीका करणाऱ्या कपिल सिब्बल यांनी बुधवारी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली आहे. कपिल सिब्बल लखनौ येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले, की त्यांनी उदयपूर येथे झालेल्या पक्षाच्या 'चिंतन शिबिरा'नंतर, 16 मे रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
यावर्षात या मोठ्या नेत्यांनी सोडला काँग्रेसचा हात -पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी गेल्या गुरुवारी दिल्लीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेल्या महिन्यात पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत काँग्रेसने त्यांना सर्व पदांवरून हटवले होते. मात्र, पंजाबमधील राष्ट्रवाद, बंधुता आणि एकता या मुद्द्यांवरून आपणच काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे जाखड यांनी म्हटले होते.
याशिवाय गुजरातमध्ये हार्दिक पटेल, आसाममध्ये रिपुन बोरा, माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार, तसेच उत्तर प्रदेशातील काँग्रेसनेते तथा माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनीही याच वर्षात काँग्रेसची साथ सोडली आहे.