ऑनलाइन लोकमत
मथुरा, दि. २१ - काँग्रेसची विचारधारा RSS सारखी नाही, तिथे मोहन भागवतांनी म्हटलं की आकाश काऴ्या रंगाचं आहे तर सर्वजण माना डोलावतात अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी संघाच्या एकछत्री नेतृत्वावर हल्ला चढवला. काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून इथे प्रत्येकाची वेगळी विचारधारा आहे आणि पटो वा न पटो इथे प्रत्येकाचे विचार स्वीकारले जातात, असेही ते म्हणाले. मथुरा येथे काँग्रेसच्या चिंतन शिबीरात ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
याआधी मी काँग्रेसला एखादी सेना व कार्यकर्त्यांना जवान समजत होतो, पण आता माझी विचारधारा बदलली आहे, मी प्रत्येक कार्यकर्त्याला माझं कुटुब मानतो आणि कुटुंबातील व्यक्तीला कधीही बाहेर काढलं जात नाही. इथे उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याच्या डीएनएमध्ये काँग्रेस आहे असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. सत्तेवर येऊन एक वर्ष उलटून गेल्यावरही मोदींनी त्यांचे वचन पूर्ण केलेले नाही. देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होणार होते, पण अद्याप एका व्यक्तीलाही पैसे मिळालेले नाहीत. OROP लागू करण्याबाबत अनेकदा वचने देऊनही ते लागू झालेले नाही. शेतकरी अद्यापही अच्छे दिनांच्या प्रतीक्षेत आहेत. मोदींची कोणतीच आश्वासने अदयाप पूर्ण झालेली नसून असे वायदे करून ते स्वत:चेच नुकसान करत आहेत, आपण सर्वजण एकत्र आलो तरी आपण त्यांचे एवढे नुकसान करू शकणार नाही, अशी टीका राहुल यांनी केली.