भाजप विजयी होऊनही काँग्रेस सशक्त; भाजपाच्या १६ जागा कमी; कॉंग्रेसला १९ जागांचा फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:35 AM2017-12-21T00:35:49+5:302017-12-21T01:40:45+5:30
गुजरातच्या मतदारांनी भाजपला ९९ जागा देऊन सहाव्यांदा सत्तास्थानी बसवले असले तरी कॉंग्रेसलाही नाकारलेले नाही. उलट सशक्त विरोधी पक्षाच्या स्वरूपात नव्या विधानसभेत कॉंग्रेसला स्थान दिले आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसतर्फे जे ८0 जण विजयी झाले, त्यापैकी बहुसंख्य नवे चेहरे आहेत. १९९८ नंतर भाजपा प्रथमच २०१७ मध्ये दोन अंकी संख्या घेऊन सत्तारोहण करीत आहे.
महेश खरे
सुरत : गुजरातच्या मतदारांनी भाजपला ९९ जागा देऊन सहाव्यांदा सत्तास्थानी बसवले असले तरी कॉंग्रेसलाही नाकारलेले नाही. उलट सशक्त विरोधी पक्षाच्या स्वरूपात नव्या विधानसभेत कॉंग्रेसला स्थान दिले आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसतर्फे जे ८0 जण विजयी झाले, त्यापैकी बहुसंख्य नवे चेहरे आहेत.
१९९८ नंतर भाजपा प्रथमच २०१७ मध्ये दोन अंकी संख्या घेऊन सत्तारोहण करीत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी १५०पेक्षा
अधिकचे लक्ष्य ठेवून निवडणूक प्रचार चालवला होता. याबाबत शहा यांना विचारले असता, ते म्हणाले की, प्रचारादरम्यान कॉंग्रेस एवढ्या खालच्या पातळीवर जाईल, हे
माहीत नव्हते. राज्यात जातीयवादी राजकारण काँग्रेसने केले. परंतु जागरूक जनतेने तो यशस्वी होऊ दिला नाही. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभव स्वीकारताना सांगितले की, गुजराती जनतेने भाजपला धडा शिकवला आहे.
सौराष्टÑमध्ये भाजपाला खूपच मोठा झटका बसला. इथे २०१२च्या निवडणुकीत भाजपला ३६ जागा मिळाल्या होत्या. यंदा केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसला सौराष्टÑमध्ये १५ जागांचा फायदा झाला. तथापि, उर्वरित राज्यात या पक्षाला ४ अतिरिक्त
जागा मिळाल्या.
एक वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या प्रमाणे मतदारांनी कौल दिला होता तोच पॅटर्न विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला. ग्रामीण भागाने कॉंग्रेसला तर शहरी भागाने भाजपला पसंती दिली. चार बड्या शहरांत भाजपला ४४ जागा मिळाल्या, तर कॉंग्रेसला ज्या १९ नवीन जागा मिळाल्या. त्यात १६ जागा ग्रामीण भागातील आहेत. काँग्रेस नेते अल्पेश ठाकूरने राधनपूरहून विजय मिळवला. ते म्हणाले की,आम्ही शहरांच्या बाबतीत चुकलो. त्या मतदारांना आमचे मुद्दे समजावून सांगू शकलो नाही.
कमी मतदानाचा फायदा-तोटा
यंदा २०१२च्या तुलनेत मतदान कमी झाले असले तरी भाजपाने त्याचा परिणाम भाजपाने आपल्या व्होट बँकेवर होऊ दिला नाही. या पक्षाला मागील वेळी ४८ टक्के मते मिळाली होती. यावेळी ४९ टक्के मते मिळाली. कॉंग्रेसला २०१२मध्ये ३८ टक्के तर यावेळी मतांचा टक्का वाढून ४१ झाला. काँग्रेसला सहा निवडणुकांनंतर ४0 टक्क्यांहून अधिक मते मिळाली.
दहा ठिकाणी विजयाचे अंतर २ हजारपेक्षा कमी
निवडणुकीत किमान १० जागी विजयी व पराभूत उमेदवारामध्ये २ हजारांचे अंतर आहे. कापरडा मतदारसंघात तर १७० मतांनी काँग्रेस उमेदवाराने विजय नोंदवला.