सभागृहाच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन झाले; काँग्रेसची पंतप्रधानांविरोधात हक्कभंगाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 05:39 AM2024-08-01T05:39:02+5:302024-08-01T05:39:41+5:30
वादग्रस्त भाषणातील वगळलेला भाग सोशल मीडियावर टाकल्याचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यप्रकरणी काँग्रेस नेते चरणजित सिंह चन्नी यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिली. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर ठाकूर यांच्या भाषणातील सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आलेल्या उताऱ्यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत, त्यामुळे सभागृहाच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन झाले, असा दावा काँग्रेसचे चन्नी यांनी या केला आहे. ज्यांना जात माहीत नाही, ते जातीय जनगणनेबद्दल बोलत आहेत, असे ठाकूर यांनी म्हटले होते.
वाढत्या रेल्वे अपघातांवर विरोधकांकडून चिंता
लोकसभेत अलीकडच्या काळात रेल्वे अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाने गेल्या १० वर्षांत रेल्वेचा व्यापक विकास, आमूलाग्र परिवर्तन झाल्याचा दावा केला.
आणखी काय झाले…
तृणमूलचे सदस्य मौसम नूर यांनी विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करीत ठोस पावले उचलण्याची मागणी केली. संस्कृतकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत हा अनिवार्य विषय बनवण्याची मागणी भाजपचे दिनेश शर्मा यांनी केली.