नवी दिल्ली : भाजपच्या वादग्रस्त खासदार व मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीवर नियुक्ती करण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेसने गुरुवारी केली.संरक्षणमंत्री राजनाथसिंह अध्यक्ष असलेल्या या समितीत २१ सदस्य असून, त्यात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटकेत असलेले जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार फारुख अब्दुल्ला, प्रज्ञा ठाकूर आदींचाही समावेश आहे. त्यापैकी फारुख अब्दुल्ला यांना ५ आॅगस्टपासून स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ते संसदेत येऊ शकलेले नाहीत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, दहशतवादाचे आरोप असलेल्या खासदाराला संरक्षणाशी संबंधित समितीवर नेमण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रज्ञा ठाकूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही माफ केलेले नाही, तर दुसऱ्या बाजूस देशाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या विषयांची जबाबदारी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर सोपविण्यात येते हे धक्कादायक आहे.हे सारे पाहता ‘मोदी असतील तर सारे काही शक्य आहे’ हे वाक्य योग्यच आहे, असेही रणदीप सुरजेवाला यांनी उपरोधाने म्हटले आहे.यंदाच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा ठाकूर यांनी भोपाळ मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजयसिंह यांचा तब्बल ३.६ लाख मतांनी पराभव केला होता. त्यावेळी प्रचारात प्रज्ञा ठाकूर यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती. महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यांच्या या विधानाने मोठा वाद निर्माण झाला होता.हा जवानांचा अपमानमहात्मा गांधींविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही, असे नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या बैठकीमध्ये सुनावले होते. काँग्रेसने एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षणविषयक सल्लागार समितीवर घेऊन मोदींनी त्यांना माफ केले आहे. दहशतवादी हल्ल्यांपासून देशाचे रक्षण करणाºया जवानांचा या नियुक्तीने अपमान झाला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
प्रज्ञा ठाकूर यांच्या निवडीला काँग्रेसचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 02:17 IST