नवी दिल्ली - भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या समितीत ठाकूर यांना स्थान देण्यात आले असून या समितेचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत संरक्षण खात्याच्या समितीत प्रज्ञा सिंह यांना स्थान देण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत एकूण 21 सदस्य आहेत. वादग्रस्त वक्तव्य करुन प्रज्ञा सिंह नेहमीच चर्चेत असतात. समितीत स्थान दिल्यामुळे काँग्रेसनेभाजपावर निशाणा साधला आहे.
संरक्षण खात्याच्या समितीत प्रज्ञा सिंह यांना स्थान देण्याचा निर्णय दूर्दैवी असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. कमलनाथ सरकारचे मंत्री पीसी शर्मा यांनी भाजपा जसं बोलतो तसं वागत नाही. पंतप्रधानांनी प्रज्ञा सिंह यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं म्हटलं होतं. मात्र अद्याप असं काही झालेलं नाही असं म्हणत भाजपावर टीका केली आहे. नथुराम गोडसेच्या भक्तांचे चांगले दिवस आल्याचा टोलाही काँग्रेसच्या एका नेत्याने लगावला आहे.
काँग्रेसचे नेते जयवीर शेरगिल यांनी भाजपा सरकारने राष्ट्रवादाचं नवं मॉडल दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ञा सिंह यांना माफ केलं जाणार नाही असं म्हटलं होतं. मात्र आता गोडसे भक्तांसाठी अच्छे दिन आल्याचं म्हटलं आहे. शेरगिल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर प्रज्ञा सिंह यांच्या संरक्षण मंत्रालय समितीतील निवडीवरून टोला लगावला आहे. तसेच काँग्रेसने ही ट्विट करून भाजपावर हल्लाबोल केला आहे.
संरक्षण खात्याच्या समितीत अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा या नेत्यांचा समावेश आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबत ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपुत्र म्हटलं होतं.
प्रज्ञा सिंह या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असे त्या म्हणाल्या होत्या. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणले होते.