ऑनलाईन लोकमत
जालंधर, दि. 20 - पंजाबच्या तख्तावर कब्जा करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता निवडणुकीपूर्वी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसने नवज्योत सिंग सिद्धू यांना पक्षात प्रवेश केल्यास उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.
पंजाबमधील भाजपाचा आघाडीचा नेता असताना सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन स्वत:च्या नव्या पक्षाची घोषणा केली. आता काँग्रेसने विधानसभा निवडणूक जिंकल्यास उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. तसेच काँग्रेसमधील सूत्रांनीही सिद्धू यांना अशी ऑफर देण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, सिद्धू यांनी काँग्रेसकडून आलेल्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितल्याची समजत आहे.
मात्र सिद्धूच्या काँग्रेस प्रवेशाबाबत पक्षाचे पंजाबमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग फारसे उत्साही दिसत नाही. तसेच सिद्धूला काँग्रेस प्रवेश करायचा असल्यास त्याला नव्याने स्थापन केलेली 'आवाज-ए-पंजाब' पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा लागेल, अशी अट घातली आहे. दहा वर्षे सत्तेबाहेर राहिल्यानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा पंजाब सत्ता स्थापन करायची संधी आहे. तसेच विविध चॅनेल्सद्वारे घेण्यात आलेल्या कल चाचण्यांनीही काँग्रेसचा उत्साह वाढवला असून, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 'आप'पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे 'अकाली दला'विरोधात जाणाऱ्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. तसेच सेलेब्रिटी म्हणून लोकप्रिय असल्याने हिंदू मतदारही सिद्धू यांच्या पक्षाला मत देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना पक्षात घेण्यासाठी काँग्रेस उत्सुक आहे.