Congress on ED Raids: '8 वर्षात EDचे 3 हजार छापे; टार्गेट फक्त विरोधक', काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 01:45 PM2023-02-20T13:45:58+5:302023-02-20T13:46:06+5:30
Congress on ED Raids: '2004 ते 2014 यूपीए सरकारच्या काळात ईडीने 112 वेळा छापे टाकले.'
Chhattisgarh Congress ED Raids: छत्तीसगडमध्ये कोळसा घोटाळ्यासंदर्भात काँग्रेस नेत्यांच्या ठिकाणांवर ईडीने (ED) टाकलेल्या छाप्यांवरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेसच्या 85व्या अधिवेशनापूर्वी ईडीने नेत्यांवर टाकलेले छापे हे सूडाच्या राजकारणाचे उदाहरण आहे. तसेच, काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, 2004 ते 2014 या काळात यूपीए सरकारच्या काळात ईडीने 112 वेळा छापे टाकले, पण 8 वर्षांत 3010 छापे टाकण्यात आले.
'ईडी हे पंतप्रधान मोदीचे हत्यार'
जयराम रमेश म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातील विरोधकांविरुद्धचे हत्यार बनले आहे. ते म्हणाले की, ईडी निष्पक्षपणे काम करत नाही. या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ईडीने गेल्या 9 वर्षात टाकलेल्या छाप्यांमध्ये 95 टक्के विरोधी नेते आहेत आणि बहुतेक काँग्रेस नेत्यांच्या विरोधात आहेत. काँग्रेस नेत्यांवर छापे टाकणे हे भाजपची भ्याडपणा दर्शवते. भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजपची अस्वस्थता दिसून येत आहे. पीएम मोदींमध्ये प्रामाणिकपणा असेल तर त्यांनी आपल्या जवळच्या मित्राच्या मोठ्या घोटाळ्यांवर छापे टाकावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.
'फक्त विरोधकांवर छापे'
पवन खेडा म्हणाले की, केवळ राजकीय पक्षांबद्दल बोलायचे तर 95 टक्के छापे फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच पडले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची चौकशी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता आमचे अधिवेशन होणार असल्याने छत्तीसगडमध्ये छापे टाकण्यास सुरुवात झाली आहे. आता ईडीचा अर्थ लोकशाही संपवणे असा झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
'ईडीच्या निशाण्यावर फक्त विरोधक'
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी 2014 पासून विरोधी पक्षांवर ईडीच्या छाप्यांची आकडेवारी देताना सांगितले की, काँग्रेसवर 24, टीएमसीवर 19, राष्ट्रवादी काँग्रेसवर 11, शिवसेना 8, द्रमुकवर 6, आरजेडीवर 5, बसपवर 5, PDP 5, INLD 3, YSRCP 2, CPM 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, AIADMK 1, MNS 1 आणि SBSP 1 वेळा छापा पडला आहे.
हिमंता बिस्वा सरमा आणि शुभेंदू अधिकारीवरही प्रश्न
ईडीच्या छाप्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पवन खेडा म्हणाले की, भाजपने हिमंता बिस्वा सर्मा यांच्या विरोधातही अनेक कागदपत्रे काढली होती, परंतु आज ते निष्पक्ष म्हणून समोर आले आहेत. पश्चिम बंगालचे शुभेंदू अधिकारी, कर्नाटकचे बीएस येडियुरप्पा, रेड्डी ब्रदर्स, नारायण राणे, मुकुल रॉय अशा नावांची यादी आहे. प्रसारमाध्यमांनी एखादी गोष्ट प्रसिद्ध केली तर ती अति प्रसिद्ध केली जाते, पण विरोधक संसदेत प्रश्न विचारल्यावर ते विधान काढून टाकतात, असेही ते म्हणाले.