'रंग बदलण्यात नितीश कुमार सरड्यांना टक्कर देताहेत', कांग्रेस नेत्याची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 01:37 PM2024-01-28T13:37:42+5:302024-01-28T13:38:14+5:30
Congress on Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला असून, पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहेत.
Bihar Political Crisis: देशाच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची सुरुवात करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला दिला आहे. तसेच, आज सायंकाळी ते भाजपच्या नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन त्यांच्यावर घणाघाती टीका केली.
बार-बार राजनीतिक साझेदार बदलने वाले नीतीश कुमार रंग बदलने में गिरगिटों को कड़ी टक्कर दे रहे हैं।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) January 28, 2024
इस विश्वासघात के विशेषज्ञ और उन्हें इशारों पर नचाने वालों को बिहार की जनता माफ़ नहीं करेगी।
बिलकुल साफ़ है की भारत जोड़ो न्याय यात्रा से प्रधानमंत्री और भाजपा घबराए हुए हैं और उससे… https://t.co/v47tQ8ykaw
काय म्हणाले जयराम रमेश?
"वारंवार राजकीय भागीदार बदलणारे नितीश कुमार बदलत्या रंग बदलण्यात सरड्यांनाही कडवी स्पर्धा देत आहेत. हा विश्वासघात करणाऱ्या तज्ज्ञांना आणि त्यांच्या तालावर नाचणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही. भारत जोडो न्याय यात्रेला पंतप्रधान आणि भाजप घाबरले असून यावरून लक्ष वळवण्यासाठी हे राजकीय नाट्य रचल्याचे स्पष्ट झाले आहे," अशी टीका जयराम रमेश यांनी केली.
इंडिया आघाडी मजबूत
दरम्यान, पश्चिम बंगालमधील बागडोग्रा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीच्या भविष्याबाबतही चर्चा केली. ते म्हणाले, ''भारताची आघाडी मजबूत आहे. काही स्पीडब्रेकर आले आहेत, मात्र आम्ही एकत्र येऊन भाजपविरोधात लढू. सर्व पक्ष - DMK, NCP, TMC आणि SP एकत्र निवडणुका लढवतील आणि भाजपचा पराभव करतील,'' असं ते यावेळी म्हणाले.
राजीनाम्याची अनेक दिवसांपासून चर्चा
गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार इंडिया आघाडी सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर नितीश कुमार राजीनामा देणार असल्याचे रविवारी ठरले. त्यांनी रविवारी सकाळी राजभवन गाठून राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशात काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका होणार असताना नितीश कुमार यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बिहारमधील महाआघाडी तसेच इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.