Congress on PM Modi: 'निवडणूक जिंकण्यासाठी PM मोदींनी इस्रायलची मदत घेतली', काँग्रेसचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 03:13 PM2023-02-16T15:13:02+5:302023-02-16T15:13:21+5:30
Congress: 'इस्रायली एजन्सीचे काम भाजपच्या आयटी सेलशी मिळते-जुळते आहे.'
Congress Attacks On PM Modi:काँग्रेसने नवी दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयात पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोपही केले. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते आणि पवन खेडा यांनी पंतप्रधान मोदी लोकशाहीशी खेळ करत असल्याची टीका केली. तसेच, निवडणुका जिंकण्यासाठी मोदी इस्रायली एजन्सीच्या मदतीने देशातील निवडणुकांवर प्रभाव टाकत असल्याचा खळबळजनक दावाही केला.
निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी पंतप्रधान मोदी इस्रायलच्या एजन्सीची मदत घेत असल्याचा आरोप काँग्रेसने यावेळी केला आहे. पवन खेडा म्हणाले की, देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. इतर देशांना भेटून सरकारमध्ये बसलेले लोक देशाच्या लोकशाहीविरुद्ध षडयंत्र रचत आहे.
काय म्हणाले काँग्रेसचे प्रवक्ते?
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी दावा केला आहे की, इस्रायली कंत्राटदारांनी जगातील तीन निवडणुकांवर प्रभाव टाकला आहे. त्यांचे मुख्य काम खोटी माहिती पसरवणे आहे. या एजन्सीच्या खुणा भारतातही सापडल्या आहेत. सरकारच्या संमतीशिवाय हे होऊ शकत नाही. खोटी माहिती पसरवण्याची त्यांची पद्धत भाजपच्या आयटी सेलशी मिळती-जुळती आहे.
भाजप राहुल गांधींविरोधात खोटं बोलत आहे
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते पुढे म्हणाल्या की, भारत जोडो यात्रेदरम्यान भाजपच्या आयटी सेलने पाकिस्तान झिंदाबादचा नारा देणारी मुलगी राहुल गांधींना भेटल्याचा खोटा प्रचार केला. तसेच राहुल गांधींच्या एका वक्तव्याचा उदयपूर हत्याकांडाशी चुकीचा संबंध जोडण्यात आला होता. काँग्रेस प्रवक्त्यांनी पुढे आरोप केला की, नागालँडच्या विकासावर भाजपचे मोठे दावे वास्तवापासून दूर आहेत. ईशान्य राज्य अजूनही व्यापक बेरोजगारी, चांगले रस्ते, वीज आणि पाणी पुरवठा यांच्या अभावाने ग्रासले आहे.