Congress on PM Modi Speech: संसदेच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (3 जुलै) मणिपूर हिंसाचारावर भाष्य केले होते. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र, आता काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या मणिपूरवरील वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे.
जयराम रमेश म्हणाले की, "पंतप्रधान मणिपूरच्या मुद्द्यावर गप्प का बसले? त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली नाही? त्यांनी खासदार आणि आमदारांशी का चर्चा केली नाही? त्यांनी यापूर्वीच या घटनेवर बोलायला हवे होते. ते वेगवेगळ्या देशांना भेटी देतात, पण त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही. यावरुन पंतप्रधानांना परिस्थितीची कितीची चिंता नाही, असा संदेश जातो."
"पंतप्रधानांनी राज्यसभेत मणिपूरबद्दल जे सांगितले, ते वास्तवाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. मणिपूर 3 मे 2023 पासून जळत आहे. समुदायांमध्ये तणाव आणि हिंसाचार सुरू आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना राज्यात दोन तृतीयांशपेक्षा जास्त मते मिळाले, पण आजपर्यंत पंतप्रधानांनी मणिपूरचा दौरा केला नाही. मणिपूरचे लोक आजही पंतप्रधान का येत नाही, अशी विचारणा करतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही मणिपूरचा फारसा उल्लेख नव्हता. हा दांभिकपणा आहे," अशी टीका जयराम रमेश यांनी केली.