Congress on Sharad Pawar : एकीकडे काँग्रेस अदानी समुहाप्रकरणी जेपीसीची मागणी करत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही चौकशी करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. एनडीटीव्ही वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले की, हिंडेनबर्गने अदानी समूहाला टार्गेट केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना म्हटले की, अदानींचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडलेले आहे, त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. पवारांचे वैयक्तिक विचार असू शकतात, पण इतर 19 समविचारी पक्षांचा असा विश्वास आहे की, हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याप्रकरणी जेपीसीद्वारे चौकशी झालीच पाहिते. एका मुद्द्यावर राष्ट्रवादीचे वेगळे मत असले तरीदेखील भाजपच्या विरोधात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह इतर 20 समविचारी विरोधी पक्ष एकजूट आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अदानींना क्लीन चिट दिली. हिंडेनबर्गवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, या रिपोर्टमधून अदानी समूहाला टार्गेट करण्यात आल्याचे दिसते. मात्र, अदानी समूहाने काही चुकीचे केले असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. याआधीही अशी विधाने समोर आली आणि अनेक दिवस संसदेत गदारोळ झाला, मात्र यावेळी अदानी प्रकरणाला जास्त महत्व दिले गेले. अदानीबाबत विधाने करणाऱ्यांची पार्श्वभूमी काय?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
जेपीसी चौकशीची गरज नाही अदानी प्रकरणात जीपीसी चौकशीबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेत प्रचंड गदारोळ केला. याबाबत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची युती आहे. पण, आम्ही काँग्रेसच्या विचारांशी सहमत नाही. जेपीसी चौकशी झाली तरी देखरेख सत्ताधारी पक्षाकडे असेल आणि सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे. अशा परिस्थितीत सत्य कसे बाहेर येईल? आता अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत जेपीसी चौकशीची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले.