नवी दिल्ली - अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्याच्या प्लॅनला मोठा झटका मिळाला आहे. हरियाणात काँग्रेसनं इंडिया आघाडीतून समाजवादी पक्षाला जागा देण्यास नकार दिला आहे तर महाराष्ट्रातील चित्र अद्याप अस्पष्ट आहे. अलीकडेच महाराष्ट्रात जागावाटपावरून बोलावलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीचं समाजवादी पक्षाला आमंत्रण नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्रातही समाजवादी पक्ष इंडिया आघाडीत जागांपासून वंचित राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी समाजवादी पक्षासोबत आघाडीची शक्यता नाकारली आहे. आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्यासोबत राष्ट्रीय स्तरावर आघाडी आहे. म्हणून हरियाणा विधानसभेत या दोन्ही पक्षांसोबत काँग्रेस आघाडी करणार नाही. काँग्रेस स्वबळावर सर्व जागा लढण्यास सक्षम आहे. कुठल्याही मित्रपक्षाला एकही जागा सोडली जाणार नाही. हरियाणात कमीत कमी १२ जागांवर समाजवादी पक्ष लढण्यास इच्छुक होता. या जागांबाबत सपाने काँग्रेस हायकमांडला माहिती दिली होती.
महाराष्ट्रात सस्पेन्स...
महाराष्ट्रात समाजवादी पक्ष महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वबळावर लढणार हे सस्पेन्स कायम आहे. नुकतीच महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली. त्यात काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे नेते एकत्रित चर्चा केली. त्या बैठकीला समाजवादी पक्षाला निमंत्रण नव्हते. समाजवादी पक्षाची मुंबईत ताकद आहे. याठिकाणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर भागातून आमदार आहेत. मुंबईत एकूण ३६ जागा आहेत. त्यातील २० जागांवर ठाकरे गटाचा दावा आहे तर काँग्रेसनेही १५ जागांवर दावा केला आहे.
अखिलेश यादव यांच्या प्लॅनला झटका
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये समाजवादी पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत उत्तर प्रदेशात ३७ जागांवर विजय मिळवला तर ३ जागांवर कमी मताधिक्याने पराभव झाला. लोकसभेतील या निकालामुळे हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढण्याच्या रणनीतीवर अखिलेश यादव काम करत होते. त्यासाठी पक्षाचे नेते इंद्रजित सरोज यांना महाराष्ट्राचं प्रभारी बनवले. लोकसभेच्या आकडेवारीनुसार, देशात समाजवादी तिसऱ्या नंबरचा पक्ष आहे परंतु त्यांच्याकडे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नाही. हा राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी समाजवादी पक्षाला आगामी ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ६ टक्के मतदान मिळवणं गरजेचे आहे. त्यात हरियाणात काँग्रेसनं समाजवादी पक्षाला नाकारल्यानंतर आता महाराष्ट्रात काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.