कर्नाटकात भाजपाला धक्का बसणार; काँग्रेसची पुन्हा सत्ता येणार, जाणून घ्या, ओपिनियन पोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 06:17 AM2023-03-30T06:17:14+5:302023-03-30T06:17:24+5:30
सध्या कर्नाटकात भाजपचे सरकार असले तरी काँग्रेस लढत देण्याची अपेक्षा आहे.
नवी दिल्ली : भाजप आणि काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, राज्यात २२४ मतदारसंघांत १० मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निकाल १३ मे रोजी येतील.
सध्या कर्नाटकात भाजपचे सरकार असले तरी काँग्रेस लढत देण्याची अपेक्षा आहे. यावेळी भाजप, काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यातच लढत होणार आहे. मागच्या वेळी जेडीएस-काँग्रेस एकत्र होते; मात्र यावेळी जेडीएस स्वतंत्र लढणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी सांगितले की, १३ एप्रिलला अधिसूचना जारी झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात हाेईल. पंजाबमधील जालंधर, ओडिशातील झारसुगुडा, उत्तर प्रदेशातील चंबे आणि स्वार, मेघालयातील सोहियोंग या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.
ओपिनियन पोल
एबीपी सी-व्होटरचे सर्वेक्षण
भाजप ६८ ते ८०
काँग्रेस ११५ ते १२७
जेडीएस २३ ते ३५
अन्य ० ते २
बहुतांश ओपिनियन पोल्सनी कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज वर्तवला आहे. आता या लढाईत राहुल गांधी यांच्यावरील कारवाईची काँग्रेसला सहानुभूती मिळते की मोदी लाट कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२० एप्रिल : उमेदवारी अर्ज
दाखल करता येणार आहेत.
२१ एप्रिल : उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
२४ एप्रिल : नावे मागे घेता येणार
५,२१,७३,५७९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
९.१७ लाख पहिल्यांदाच मत देणार