नवी दिल्लीः दिल्ली सरकारनं देशद्रोहाच्या प्रकरणात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील छात्र संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि अन्य दोघांविरोधात खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजुरी दिली आहे. यावरून काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी केजरीवाल सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर दिल्ली सरकारलाही देशद्रोहाचा कायदा अजूनही समजला नसल्याचं त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
पोलिसांनी 2016च्या प्रकरणात कुमारसह जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपींनी नऊ फेब्रुवारी 2016 जेएनयू परिसरात एका कार्यक्रमादरम्यान रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये देशविरोधी घोषणा देत समर्थन केलं होतं. तर केजरीवाल सरकारने या देशद्रोहाच्या प्रकरणात कन्हैया कुमार आणि अन्य दोघांविरोधात खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजुरी दिली आहे.
तर यावर बोलताना चिदंबरम म्हणाले की, दिल्ली सरकारलाही केंद्र सरकारप्रमाणेच देशद्रोहाच्या कायद्याबद्दल फारशी माहिती दिसत नाही. त्यामुळे कन्हैया कुमार व इतरांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ ए आणि १२० बी अन्वये देशद्रोहाचा खटला चालविण्यास मंजुरी देण्याचा निर्णयाला मी विरोध करत असल्याचे चिदंबरम म्हणाले आहे.