नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (Congress P Chidambaram) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. "नोटबंदीच्या दुर्दैवी निर्णयाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या निर्णयामुळे लोकांचा किती फायदा" झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. "पहिल्यांदा आपल्या पंतप्रधानांनी म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था ही कॅशलेस बनली पाहिजे. मात्र त्यानंतर मोदींनी निर्णय बदलला, नोटबंदीचा निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे आपन कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालो" असं म्हणत चिदंबरम यांनी निशाणा साधला आहे.
पी. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "देशातील काळा पैसा परत मिळावा आणि कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी म्हणून नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. नोटबंदीनंतर कुठलाही काळा पैसा बाहेर आला नाही. एवढेच नव्हे तर नोटबंदी जेव्हा करण्यात आली तेव्हा देशभरात 18 लाख कोटी रुपये चलनामध्ये होते. तर आता सध्या 28.5 लाख कोटी रुपये चलनामध्ये आहेत. म्हणजेच मोदींचा दुसरा उद्देश देखील फसल्याचे दिसून येते" असं म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सोमवारी नोटबंदीला पाच वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. नोटबंदी यशस्वी झाली तर भ्रष्टाचार का नाही संपला? असा सवाल विचारत प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच नोटबंदी ही एक आपत्ती असल्याचं देखील म्हटलं आहे.
"जर नोटबंदी यशस्वी झाली तर भ्रष्टाचार का नाही संपला?"
प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. "नोटबंदी यशस्वी झाली असेल तर भ्रष्टाचार का नाही संपला?, काळा पैसा का परत आला नाही? अर्थव्यवस्था कॅशलेस का झाली नाही? दहशतवाद का संपत नाही? महागाई नियंत्रणात का नाही?" असे प्रश्न प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला विचारले आहेत. यासोबतच प्रियंका यांनी Demonetisation Disaster हा हॅशटॅग देखील वापरला आहे.