काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना अहवाल सादर; निवडणुकीत पराभवाची समीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:37 AM2021-06-03T06:37:34+5:302021-06-03T06:37:54+5:30
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुड्डुचेरी येथे नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात तामिळनाडू वगळता इतर राज्यांत काँग्रेसला मोठा फटका बसला.
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुड्डुचेरी येथे नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात तामिळनाडू वगळता इतर राज्यांत काँग्रेसला मोठा फटका बसला. या निवडणुकांतील पराभवाची समीक्षा करण्यासाठी काँग्रेसने स्थापन केलेल्या पाच सदस्यांच्या समितीने आपला अहवाल पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना सादर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या समितीत पक्षाचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद, मनीष तिवारी आणि विंसेट पाला यांचा समावेश होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे या समितीचे नेतृत्व होते. समितीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुड्डुचेरीतील नेत्यांशी अनेक बैठका केल्या. अहवाल सादर करण्यासाठी या समितीला दोन आठवड्यांचा वेळ दिला गेला होता.या समितीतील माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी हे काँग्रेसच्या ‘जी २३’ समूहाचेही सदस्य आहेत. हा समूह संघटनात्मक निवडणूक आणि जबाबदारीसह उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून करीत आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (सीडब्ल्यूसी) डिजिटल बैठकीत, निवडणूक निकालाच्या कारणांची माहिती मिळविण्यासाठी छोटी समिती तयार करण्यात यावी, असा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ठेवला होता.
पश्चिम बंगालमध्ये खातेही उघडले नाही
आसाम आणि केरळमध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला पराभव पत्करावा लागला तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे खातेही उघडले नाही. तसेच पुड्डुचेरीतही काँग्रेसचा पराभव झाला. येथे निवडणुकीच्या काही दिवस आधीपर्यंत काँग्रेस सत्तेत होती. तामिळनाडू काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला, येथे द्रमुकसोबत असलेल्या त्यांच्या आघाडीला विजय मिळाला.