मुंबई : पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम या तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव का झाला? यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींना दिल्लीत पाठवला आहे. गेले काही दिवस सातत्याने ते या तीनही राज्यातील विविध नेत्यांशी चर्चा करत होते. पश्चिम बंगालचा अहवाल अद्याप दिलेला नाही. या अहवालात पक्षसंघटना मजबूत करणे व निवडणूक व्यवस्थापनाच्या अनुषंगाने शिफारसी करण्यात आल्या आहेत.देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी स्थापन केली होती. समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खा. ज्योती मणी हे चार सदस्य होते. देशात नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या समितीने या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून १५ दिवसांत अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करावा, असे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार चव्हाण यांनी तीनही राज्यातील पक्ष संघटनेच्या विविध नेत्यांशी चर्चा केली. निवडणुकीत जिंकलेले आणि पराभूत झालेले उमेदवार, संघटनेचे विविध नेते, तिकीट देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीचे अध्यक्ष यांच्यासह समितीच्या पाचही सदस्यांनी दररोज किमान ५-६ तास वेळ देऊन संबंधित राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष आदींशी विस्तृत चर्चा केली. तीन राज्यातील सुमारे दीडशे व्यक्तींशी चर्चा करण्यात आली.या चर्चेदरम्यान संकलित झालेल्या माहितीच्या आधारे समितीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या कामगिरीची कारणमीमांसा केली, काही निष्कर्ष काढले व त्याआधारे पक्षाला काही शिफारसी केल्या. याबाबत समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. हा अहवाल काँग्रेस पक्षाची संपत्ती असल्याने त्याबाबत अधिक बोलता येणार नसल्याचे सांगितले.
पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम राज्यांचा पाहणी अहवाल कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 9:28 AM