नवी दिल्ली - लोकसभेत काँग्रेसचा नेता निवडण्यासाठी एक जून रोजी काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात ही बैठक होणार आहे. यावेळी पुढील लोकसभेच्या सत्रासाठीची रणनिती ठरविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. राहुल यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारल्यास त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसला केवळ ५२ जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत देखील २०१४ प्रमाणे विरोधी पक्ष नेते पद मिळणार नाही. त्यातच आता लोकसभेचा नेता निवडण्यासाठी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सध्याच्या घडीला काँग्रेसकडे प्रभावी चेहऱ्यांची कमतरता आहे.
दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. त्यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारल्यास, राहुल यांच्याकडे लोकसभेचे नेतेपद देण्यात येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही शक्यता फेटाळली आहे. तर राहुल यांनी नेता होण्यास नकार दिल्यानंतर ज्येष्ठतेनुसार या पदासाठी मनिष तिवारी आणि शशी थरूर यांचा विचार होण्याची शक्यता आहे.