जयपूर- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणं राजस्थानमधील काँग्रेस नेत्याच्या अंगलट आलं आहे. पक्षाने त्या नेत्याचं सदस्यत्व रद्द केलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, राजस्थानच्या युथ काँग्रेसचे महासचिव ब्रम्हप्रकाश बिश्नोई यांनी राहुल गांधींना त्यांच्या व्हॉट्अॅपवर पप्पू म्हटलं. ब्रम्हप्रकाश बिश्नोई केशव चंद्र यादव यांना राजस्थानच्या युथ काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्याच्या निर्णयावर नाराज होते. या निर्णयावरील नाराजी व्यक्त करण्यासाठी बिष्णोई यांनी ग्रुपमध्ये मेसेज केला की, आता समजलं राहुल गांधींना पप्पू का म्हणतात?
त्याच ग्रुपमध्ये युथ काँग्रेसचे प्रभारी देवेंद्र कादयानसुद्धा सहभागी होते. बिश्नोई यांचा हा मेसेज लगेच व्हायरल झाला. त्यानंतर सोमवारी (ता.१४मे) संध्याकाळी बिश्नोई यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. बिश्नोई यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा अपमान केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे पक्षाने म्हटलं आहे.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केशवचंद्र यादव यांना युथ काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आलं होतं. राज्यात युथ काँग्रेसला मजबुत करण्यासाठी राहुल गांधी यांनी यादव यांची निवड केली होती. राहुल गांधी यांनी हा निर्णय पक्षातील तरुणांना जोडण्यासाठी व व्होटबँक मजबूत करण्यासाठी घेतला होता. यादव यांनी यापूर्वी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना, भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहिलं आहं. बिश्नोई हे काँग्रेसचे नेते अशोक चांदना यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येते. चांदना यांना अध्यक्षपदाची संधी न दिल्याने ते खूप नाराज होते.