Congress Nyay Yatra : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राहुल गांधींनी आता दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात १४ जानेवारी ते ३० मार्च दरम्यान मणिपूर ते महाराष्ट्र अशी भारत न्याय यात्रा काढली होती. आता काँग्रेस २३ ऑक्टोबरपासून दिल्लीत न्याय यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. या न्याय यात्रेदरम्यान दिल्लीतील भाजपच्या तीन वेळा विजयी खासदारांच्या अपयशाचा मुद्दा ठळकपणे मांडणार आहे.
काँग्रेसची न्याय यात्रा २३ ऑक्टोबरपासून दिल्लीतून सुरू होणार आहे. या यात्रेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा २३ ऑक्टोबरपासून सुरू होऊन २८ नोव्हेंबरला संपेल. काँग्रेस न्याय यात्रेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत ही यात्रा २३ ते २८ ऑक्टोबर दरम्यान निघणार आहे. त्यानंतर ४ ते १० नोव्हेंबर,१२ ते १८ नोव्हेंबर आणि शेवटच्या टप्प्यात २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत निघणार आहे.
यासोबतच मोदी सरकार, दिल्लीचे नायब राज्यपाल आणि आप सरकार यांच्यातील वादावर देखील न्याय यात्रेतून प्रकाश टाकला जाणार आहे. केजरीवाल सरकार आणि आपचे मद्य धोरण प्रकरणाला लक्ष्य करण्याबरोबरच त्यांच्या धोरणांवरही काँग्रेसकडून निशाणा साधला जाणार आहे. पंजाब आणि हरियाणाच्या धर्तीवर दिल्लीतही काँग्रेस आणि आपमध्ये युती होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे न्याय यात्रेतून काँग्रेसला निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.
या यात्रेदरम्यान, काँग्रेसकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली जाणार आहे. आप सरकारवरला घेरण्यासाठी काँग्रेस पक्ष विविध मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात प्रदर्शनांचे आयोजन करणार आहे. याशिवाय विविध अहवालातून आलेली माहिती लोकांसमोर मांडण्यात येणार आहे. असं असले तरी केजरीवाल यांचा आप पक्ष केंद्रातील इंडिया आघाडीचा भाग राहणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुढच्या वर्षी दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२५ मध्ये संपणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच नोव्हेंबरमध्ये दिल्लीत निवडणुका घेण्याची मागणी केली होती. केजरीवाल यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसोबतच येथेही निवडणुका घ्याव्यात, असे म्हटले होते.
कशी असणार न्याय यात्रा?
पहिला टप्पा- २३ ते २८ ऑक्टोबरदुसरा टप्पा- ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरतिसरा टप्पा- १२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबरचौथा टप्पा- २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर