शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस देशाच्या सुरक्षेवरून मोदी सरकारला संसदेच्या आगामी अधिवेशनात घेरण्याची तयारी करीत आहेत. याचे संकेत बुधवारी पक्षाचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी, सुशीलकुमार शिंदे, सलमान खुर्शीद हे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉटसॲपवरून झालेल्या खुलाशावरून बोलत असताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी दिले.आझाद आणि शिंदे म्हणाले की, अधिवेशन सुरू झाल्यावर विरोधी नेत्यांशी चर्चा करून काँग्रेस रणनीती ठरवेल. लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि पंतप्रधान मोदी यांना होती. बालाकोटमधील हवाई हल्ल्याच्या तीन दिवस आधी गोपनीय माहिती अर्णब गोस्वामी यांना कोणीतरी एकाने दिली. गोपनीय कायद्यानुसार ही गंभीर बाब आहे. राजद्रोहासारखाच हा गुन्हा आहे, असा युक्तिवाद करून संबंधित मंत्र्यांना काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे होते की, चॅटसमधून खुलासा झाला की, ‘सीसीएस’ च्या सदस्यांकडून देशाचे सर्वोच्च संरक्षण भेद लीक झाले. असे होणे देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी घातक आहे. ओएसए आणि गोपनीयतेच्या संवैधानिक शपथेचे उल्लंघन करणारे मंत्री तथा अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांना तत्काळ बरखास्त केले जावे. गोस्वामी-व्हाॅट्सॲप्प चॅट प्रकरणाने पंतप्रधान, गृहमंत्री आणि उच्च पदांवर बसलेल्या लोकांनी देशाच्या सुरक्षेबाबत केलेला अक्षम्य अपराध व संविधानच्या शपथेशी तडजोड करून भेसूर चेहरा दाखविला आहे.
शेतकरी आंदोलन मध्यमवर्गावरही परिणाम करणारे असेल- राहुल गांधी -
- आंदोलन हे फक्त शेतकऱ्यांचे आहे, असे समजणे चूक आहे. नव्या तीन कृषी कायद्यांचा परिणाम किमान आधारभूत भाव (एमएसपी) नष्ट होऊन धान्याचे भाव भडकतील, तेव्हा मध्यमवर्गावरही होईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले.- राहुल गांधी यांनी ट्वीटरवर याच मुद्यावर सरकारला घेरले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त आपले पत्रकार आणि भांडवलदार मित्रांसाठी काम करीत आहेत. आज वस्तुस्थिती सगळ्यांच्या समाेर आहे.
- पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉटस्-ॲप चॅटिंगवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही मोदी सरकारवर तिखट हल्ला केला. त्या म्हणाल्या, ‘देशाच्या सुरक्षेशी संबंधित अतिगोपनीय माहिती एका पत्रकाराला दिली गेली. आमच्या देशाचे वीर जवान शहीद झाले. पत्रकार म्हणतो की, ‘आमचा फायदा होईल.’ राष्ट्रवादाचा दावा करणारे राष्ट्रद्रोही कारवाया करताना पकडले गेले. ही खूप गंभीर बाब आहे. याची तटस्थ चौकशी झाली पाहिजे.” सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नाही, तर दुसरीकडे जवानांच्या जीविताशी खेळत आहे, असेही गांधी म्हणाल्या.