आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उदयपूरमध्ये झालेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसने अनेक नवे विभाग बनविण्याची घोषणा केली होती. यात सर्वात महत्त्वाचा विभाग आहे इलेक्शन मॅनेजमेंट डिपार्टमेंट. दीर्घ काळापासून याची मागणी पक्षातून होत होती. अद्याप हा विभाग स्थापनही झाला नाही तोच काँग्रेसने शेवटच्या स्तरापर्यंत उतरण्याचा कार्यक्रम आखला आहे.
त्यानुसार, हा विभाग ६५०० काँग्रेस नेत्यांना देशाच्या प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात पाठविणार आहे. तालुका स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत एक कार्यपद्धती पक्ष तयार करीत आहे. अगोदर ग्रामीण, तालुका, जिल्हा स्तरापर्यंत समिती स्थापन करण्यात येईल. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समिती आपल्या या विशेष लोकांच्या माध्यमातून सर्वच बाबींची पडताळणी करणारी कार्यपद्धती तयार करेल. जो व्यक्ती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचा प्रभारी असेल तो याची माहिती देईल. मात्र, तिकीट कोणाला द्यायचे याचा निर्णय पक्ष घेईल.
नवा प्रस्ताव का आला समोर?
- आसाम, पश्चिम बंगाल, केरळ विधानसभा निवडणुका हरल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना हे सांगितले होते की, आमचे इलेक्शन मॅनेजमेंट भाजपासमोर खूपच कमजोर आहे. त्यामुळे आम्ही निवडणुका हरतो.
- अलीकडेच काँग्रेसचा पाच राज्यात पराभव झाला तेव्हा रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही हेच सांगितले होते की, इलेक्शन मॅनेजमेंट डिपार्टमेंट असायला हवे.
- प्रशांत किशोर हे या विभागाचे सरचिटणीस होऊ इच्छित होते. तसेच, त्यांची अशीही अट होती की, ते काँग्रेस अध्यक्षांशिवाय कोणालाही रिपोर्ट करणार नाहीत. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावर आता पूर्णविराम लागला आहे.