नांदेड - काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. जे दिवसेंदिवस बुडतच चालले आहे. काँग्रेससोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसारखे मित्रही एकतर स्वत: बुडत आहेत किंवा काँग्रेसची साथ सोडून पळ काढत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा आज नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मोदींनी काँग्रेस आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
मोदी म्हणाले, आज काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारथी झाली आहे. हे जहाज दिवसेंदिवस बुडत चालले आहे. तसेच राष्ट्रावादीसारखे काँग्रेसचे मित्रपक्षही एकतर बुडत आहेत किंवा काँग्रेसची साथ सोडून जात आहेत. काँग्रेसचे नेते आपापसात लढत आहेत. तसेच महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी दुबळी झाल्याने त्यांचे अनेक नेते निवडणूक लढवण्याऐवजी मैदानातून पळ काढत आहेत.
यावेळी नरेंद्र मोदींनी वायनाड येथून निवडणूक लढवणाऱ्या राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. अमेठी येथे पराभवाची भीती वाटल्यानेच राहुल गांधी यांनी वायनाड येथील सुरक्षित मतदारसंघाकडे कूच केले आहे. असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करून मोदींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली.