Congress pawan Khera : आज (२३ फेब्रुवारी) सकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते पवन खेडा यांना दिल्लीविमानतळावरुन छत्तीसगडला जाण्यापासून रोखण्यात आले. यानंतर पक्षाच्या नेत्यांनी विमानतळावरच निदर्शने केली. खेडा यांना दिल्ली विमानतळावर रोखण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच, इंडिगो एअरलाइन्सने पवन खेडांना रायपूरला न नेण्याच्या सूचना मिळाल्याचे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर लखनऊमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पवनखेडा यांच्यावरील कारवाईला या प्रकरणाशी जोडले जात आहे. आसाम पोलीस वॉरंट घेऊन विमानतळावर पोहोचल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या ही, ही मनमानी आहे. कायद्याचे राज्य आहे का? हे कोणत्या आधारावर आणि कोणाच्या आदेशावर केले जात आहे?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आसाम पोलिसांच्या सांगण्यावरुन दिल्ली पोलिसांनी पवन खेडा यांना विमानतळावर रोखले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याला हुकूमशाही म्हटले. हुकूमशाहीचे दुसरे नाव 'अमितशाही', असेही ते म्हणाले. तसेच, मोदी सरकारला आमचे राष्ट्रीय अधिवेशन उधळून लावायचे आहे. पण आम्ही घाबरत नाही, देशवासीयांसाठी लढत राहू, असेही ते म्हणाले.
अधिवेशनापूर्वी भाजपची कारवाईकाँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हे प्रकरण ट्विट करण्यात आले आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते इंडिगो फ्लाइट 6E-204 ने दिल्लीहून रायपूरला जात होते. सर्वजण फ्लाइटमध्ये चढले होते, त्याचवेळी पवन खेडा यांना फ्लाइटमधून उतरण्यास सांगण्यात आले. ही हुकूमशाही वृत्ती आहे. या हुकूमशहाने अधिवेशनापूर्वी ईडीचे छापे पाडले आणि आता त्यांनी असे कृत्य केले आहे.
याप्रकरणी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. केसी वेणुगोपाल यांनीही ट्विट करून मोदी सरकार गुंडांच्या टोळीप्रमाणे वागत आहे. पवन खेरा यांना एआयसीसीच्या बैठकीला येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी याला लाजिरवाणे म्हटले आहे.
पवन खेडांची मोदींवर टीकापवन खेडा अदानीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत होते. यावेळी त्यांनी मोदींच्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह टीका केली होती. अटलबिहारी वाजपेयी जेपीसी बनवू शकतात, तर नरेंद्र 'गौतम दास' मोदींना काय अडचण आहे? मात्र, निवेदन दिल्यानंतर खेडा यांनी आजूबाजूच्या लोकांना पंतप्रधानांच्या वडिलांचे नाव बरोबर म्हटले आहे का, असा सवाल केला. नरेंद्र गौतमदास मोदींना काय अडचण आहे? गौतम दास की दामोदर दास? दामोदर दास असले तरी त्यांची कामे गौतम दास सारखीच आहेत, असे म्हटले. नंतर एका ट्विटमध्ये खेरा यांनी स्पष्ट केले की पंतप्रधानांच्या नावाबाबत मी संभ्रमात होतो.