काँग्रेसनं मला 12 वर्षं छळलं, अमित शहांना तुरुंगात टाकलं; मोदींचा 'भावनिक' हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 07:50 PM2019-01-12T19:50:11+5:302019-01-12T19:51:14+5:30
काँग्रेस आणि काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या व्यवस्थेने सलग 12 वर्ष मला त्रस्त केले, असे मोदी म्हणाले.
नवी दिल्ली - भाजपाच्या राष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांवर भावनिक हल्ला केला आहे. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असताना काँग्रेस आणि त्यांच्या हितचिंतकांनी, काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या व्यवस्थेने सलग 12 वर्ष मला त्रस्त केले, असे मोदींनी सांगितले.
भाजपाच्या संमेलनात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ''मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेस, त्याचे सहकारी, त्यांच्या इशाऱ्यावर चालणारी व्यवस्था, तसेच त्यांच्या रिमोटवर चालणारे नेते आणि अधिकाऱ्यांनी मला हर तऱ्हेने त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांनी मला छळण्याची एकही संधी सोडली नाही.''
''2007 साली तर काँग्रेसचे एक मोठे नेते गुजरातमध्ये प्रचार सभेला संबोधित करताना म्हणाले होते की, मोदी काही महिन्यांत तुरुंगात जाईल. तर विधानसभेमध्ये काँग्रेसचे नेते भाषण द्यायचे की, मोदींनी तुरुंगात जायची तयारी करावी. आता मुख्यमंत्री आहात तर तुरुंगांचा साफसफाई व्यवस्थित ठेवा कारण तुम्हाला पुढचे जीवन तुरुंगातच काढायचे आहे,'' असे मोदींनी सांगितले.
आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांनी सीबीआयवर घातलेल्या बंदीबाबत बोलताना मोदींनी या निर्णयावर जोरदार टीका केली. ''आता सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय तुम्ही ऐकलाच असेल. या निर्णयामुळे यूपीए सरकारने मोदींना फसवा, अमित शाह यांना तुरुंगातच टाका, असा अजेंडा राबवला होता, हे समोर आले आहे. पण आम्ही तेव्हा सीबीआयला गुजरातमध्ये येता येणार नाही, असा नियम बनवला नव्हता. आमच्याकडे सत्ता होती. कायदे कानूनही ठावूक होते. पण आमचा सत्य आणि न्यायावर विश्वास होता.''असा टोला मोदींनी लगावला. देशात काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाई केली जात आहे. त्यामुळेच देशातील राजकारण बदलत आहे, असा दावाही मोदींनी केला.