काँग्रेसने जाहीरनाम्यात मोठा डाव खेळला! आरक्षणाची ५० टक्के मर्यादा रद्द करणार; महिला, बेरोजगारांना १ लाख देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:15 PM2024-04-05T12:15:17+5:302024-04-05T12:17:00+5:30
Congress manifesto Loksabha Election 2024: काँग्रेस पक्षाचे निवडणूक घोषणापत्र आज जारी करण्यात आले. यामध्ये पाच न्याय आणि ३० गॅरंटींचा समावेश करण्यात आला आहे.
लोकसभेचे पडघम सुरु होताच काँग्रेसने मोठा डाव खेळला आहे. पक्षाचे निवडणूक घोषणापत्र आज जारी करण्यात आले. यामध्ये पाच न्याय आणि ३० गॅरंटींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये युवा न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय, श्रमिक न्याय आणि भागीदारी न्याय अशा मुद्द्यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे काँग्रेसने ५० टक्के असलेली आरक्षणाची सीमा बदलण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्रासह बिहार, युपी, राजस्थान सारख्या राज्यांत आरक्षणावरून आंदोलने सुरु आहेत. यावर काँग्रेसने डाव खेळला आहे. आपण सर्व मिळून या अन्याय काळाच्या काळोखाला दूर करू, भारताच्या लोकांसाठी एक समृद्ध आणि न्यायपूर्ण असा सामंजस्यपूर्ण भविष्याचा रस्ता बनवुया असे आवाहन काँग्रेसने मतदारांना केले आहे.
काँग्रेसने देशातील युवावर्गाला ३० लाख सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. तसेच एका वर्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. भागीदारी न्याय अंतर्गत जातीय जनगणना आणि आरक्षणाची ५० टक्के सीमा संपविण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना एमएसपीला कायदेशीर दर्जा, कर्ज माफी आयोगाची स्थापना व जीएसटीमुक्त शेतीचे आश्वासन देण्यात आले आहे.
श्रमिक न्याय अंतर्गत मजुरांना आरोग्य़ाचा अधिकार देण्यासोबतच कमीतकमी मजुरी ४०० रुपये प्रतिदिन करण्याचे तसेच शहरी रोजगार गॅरंटी देण्याचे आश्वासन दिले आहे. नारी न्याय अंतर्गत महिलांना महालक्ष्मी गॅरंटी. गरीब महिलांना एक एक लाख रुपये दरवर्षी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.