- व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत ओबीसी (२५ टक्के) आणि आदिवासी (१५ टक्के) हे समीकरण सत्तारुढ भाजपविरुद्ध प्रभावी ठरेल, असा विचार करून काँग्रेसने गुजरात प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी ओबीसी समुदायाचे जगदीश ठाकोर यांची नियुक्ती केली. भाजपच्या पटेल कार्डला अटकाव घालण्यासाठी काँग्रेसने गुजरातमध्ये ओबीसी कार्ड खेळले आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ओबीसी नेते जगदीश ठाकोर यांंची गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेतेपद आदिवासी समुदायाच्या व्यक्तीला दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदी ठाकोर यांच्या नियुक्तीने गुजरातमधील काँग्रेस नेते खूश आहेत; परंतु, ठाकोर यांना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसला उभारी देण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, असेही या नेत्यांना वाटते. ठाकोर हे उत्तर गुजरातचे आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नवीन नेता सौराष्ट्रमधील असेल. ज्येष्ठ आणि नवीन नेत्यांना एकत्र आणण्यास ही नवीन टीम यशस्वी ठरली, तर आगामी निवडणुकीत भाजप आणि आम आदमी पार्टीविरुद्ध अटीतटीची लढत ठरेल.