नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाचं 84 वं राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून (17 मार्च) झालं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन दिवसीय पूर्ण अधिवेशनचं उद्धाटन केलं. काँग्रेस पक्षाचं हे पूर्ण अधिवेशन आठ वर्षांनंतर आयोजीत करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला सोनिया गांधी यांनीही हजेरी लावली होती. कार्यक्रमाला जाताना सोनिया गांधी यांनी केलेल्या एका कामामुळे सोशल मीडियावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. एका ट्विटर युजरने केलेल्या ट्विटनुसार, गर्दीमधील एका महिलेचा मोबाइल गॅलेरीमध्ये पडला होता. अनेक लोकांनी तेथून ये-जा केली पण कुणीही तो मोबाइल उचलून महिलेला दिला नाही. त्याच मार्गाने सोनिया गांधी जात असताना त्यांना तो मोबाइल दिसला. सोनिया गांधी यांनी तो मोबाइल उचलून त्या मुलीच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. या ट्विटर युजरने सोनिया गांधी मोबाइल उचलतानाचा फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनिया गांधी मोबाइल उचलून त्या मुलीच्या हातात देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सोनिया गांधी यांच्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.
विनय नावाच्या एका ट्विटर युजरने म्हंटलं आहे की, नम्रपणा सोनिया गांधी यांच्या चेहऱ्यावर नेहमीच दिसतो. त्या एक महान महिला असून त्यांची वागणूक त्यांच्या स्वभावाबद्दलची माहिती देते. असे अनेक ट्विट करत ट्विटर युजर्सनी सोनिया गांधी यांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या आजच्या अधिवेशनात बोलताना सोनिया गांधी यांनी भाजपावर सडकून टीका केली. 'सब का साथ, सब का विकास', 'न खाऊंगा न खाने दुंगा' ही नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणाबाजी निव्वळ ड्रामेबाजी होती, सत्ता मिळवण्यासाठी - खुर्ची मिळवण्यासाठी केलेली चाल होती, हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी काँग्रेसला संपवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद सगळ्याचा वापर केला. पण सत्तेच्या अहंकारापुढे काँग्रेस पक्ष कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही, असा निर्धार काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज काँग्रेसच्या महाअधिवेशनात व्यक्त केला.