नवी दिल्ली - काँग्रेस पार्टीच्या 84व्या महाअधिवेशनाला आजपासून राजधानी नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच हे महाअधिवेशन होणार असल्यानं सर्वांचे याकडे लक्ष आहे. या अधिवेशनादरम्यान पार्टीची पुढील पाच वर्षांची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. सोबत आर्थिक तसंच परदेशी व्यवहारांसहीत चार महत्त्वपूर्ण प्रस्ताव पारित केले जाणार आहेत. काँग्रेसच्या हे महाअधिवेशन होण्यापूर्वी शुक्रवारी यासंबंधी पार्टीच्या समितीची बैठक पार पडली होती.
राहुल गांधींच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, ए.के.अँटोनी, जनार्दन द्विवेदी यांच्यासहीत पार्टीतील दिग्गज उपस्थित होते. या बैठकीत महाअधिवेशनादरम्यान पारित करण्यात येणाऱ्या चार प्रस्तावांवर विचारविनिमय करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पार्टीचे मीडिया विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, राहुल गांधीं यांनी पक्षाध्यक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर काँग्रेसचे हे पहिले महाअधिवेशन आहे. या कार्यक्रमात राहुल गांधींच्या नेतृत्वात पार्टीची पुढील पाच वर्षांपर्यंतची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. तसंच चार प्रस्तावांवर चिंतन बैठकीमध्ये अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. महाअधिवेशनात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेतल्यानंतर त्याच्या अनुरुपात बदल केल्यानंतरच ते पारित केले जातील. शिवाय, अधिवेशनात काँग्रेस वर्ष 2019चा मुद्दाही लक्षात ठेवणार आहे. कारण 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.