Congress Politics: उत्तर प्रदेशातील पिलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. या चर्चेने यूपीमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. 'भारत जोडो यात्रे'चे नेतृत्व करत असलेले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यानंतर ही चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. पण आता त्यात नवा ट्विस्ट आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरुण गांधी आणि त्यांची चुलत बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यात पक्षप्रवेशाबाबत बोलणी सुरू आहे. यापूर्वी ही बोलणी कौंटुंबिक स्तरावर केली जात होती, पण आता याला राजकीय वळण लागले आहे. राजकीय पंडितांचा दावा आहे की, वरुण गांधी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न बहिण प्रियांका गांधी यांच्यावर सोपवण्यात आला आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?राहुल गांधींच्या वक्तव्याने ही सारी चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. जेव्हा त्यांना वरुण गांधींच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, "तुम्ही हा प्रश्न खर्गे जी यांना विचारा. शिवाय, त्यांचे(वरुण गांधी) किंवा इतर कुणाचेही भारत जोडो यात्रेत स्वागतच आहे. परंतु, ते सध्या भाजपमध्ये आहेत, त्यांना तिथे अडचणी असतील." असे वक्तव्य राहुल यांनी केले.
वरुण गांधी यांच्या वक्तव्यानंतर चर्चायापूर्वी वरुण गांधी यांनी भाजपवरील नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, "देशाला जोडण्यासाठी राजकारण केले पाहिजे, तोडण्यासाठी नाही. लोकांना हिंदू-मुस्लिम राजकारण नकोय, त्यांना बेरोजगारीवर चर्चा झालेली पाहिजे आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर असताना या सर्व गोष्टी बोलल्या गेल्या, त्यामुळेच चर्चा सुरू झाली आहे.