काॅंग्रेस+प्रशांत किशाेर, रणनीतीकाही जमेना; पक्षप्रवेशाचा प्रस्ताव नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 07:58 AM2022-04-27T07:58:40+5:302022-04-27T07:59:00+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यशाची चव चाखता यावी यासाठी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांच्याकडे चिंतन शिबिरापूर्वी संघटनेतील सक्षम कृतिगटाचे नेतृत्व सोपविण्याची तयारीही झाली.
शरद गुप्ता
नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबतच्या चर्चांना अखेरीस मंगळवारी पूर्णविराम मिळाला. स्वत: किशोर यांनीच काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव नम्रपणे नाकारत असल्याचे ट्विट केले. त्यानंतर लगोलग काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या ट्वीटला दुजोरा दिला.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यशाची चव चाखता यावी यासाठी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांच्याकडे चिंतन शिबिरापूर्वी संघटनेतील सक्षम कृतिगटाचे नेतृत्व सोपविण्याची तयारीही झाली. परंतु या सर्व चर्चांना स्वत: किशोर यांनी मंगळवारी पूर्णविराम दिला. त्या आशयाचे ट्विट किशोर यांनी केले.
कारणे काय?
किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाला पक्षातूनच विरोध होता. प्रशांत किशोर यांना पुढील लोकसभा निवडणुकांपर्यंत काँग्रेसचे नेतृत्व आपल्या हाती हवे होते. सक्षम कृतिगटाचे अध्यक्षपदही त्यांना हवे होते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यास आक्षेप घेतला. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर यांनी पक्ष संघटना आणि चार कोटी निष्ठावंत मतदारांची ओळख दर्शवणारी माहिती यांची मागणी पक्षाकडे केली होती. ही एक प्रकारची डेटा चोरी असू शकेल, अशी शंका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केली.
किशोर यांनी तेलंगण राष्ट्र समितीच्या प्रचाराची जबाबदारी ‘आय-पॅक’ या कंपनीकडे घेतली. यालाही काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून आक्षेप घेण्यात आला. सादरीकरणात किशोर यांनी ६०० स्लाइड्स दाखविल्या, अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने काँग्रेस नेत्यांनी किशोर स्वत:च्या बढाईसाठी अपवृत्त पसरवत असल्याचा आरोप केला.यांचा होता विरोध : पी. चिदम्बरम, दिग्विजयसिंह, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, मणिक्कम टागोर, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि राहुल गांधी यांची टीम- प्रियंका गांधी आणि त्यांच्या समर्थकांचा मात्र प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाला पाठिंबा होता.
संघटनात्मक अडचणीच्या खोलवर रूतलेल्या मुळांवर घाव घालण्यासाठी काँग्रेसला सक्षम नेतृत्व आणि इच्छाशक्ती यांची पक्षाला माझ्यापेक्षा नितांत गरज आहे. सक्षम कृतिगटाचा भाग म्हणून पक्षप्रवेशाबरोबरच निवडणुकांशी संबंधित जबाबदारी स्वीकारण्यासाठी पक्षाने देऊ केलेल्या प्रस्तावाला मी नम्रपणे नकार देतो.