काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदींबाबत (PM Narendra Modi) केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाला आहे. खर्गे यांनी पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर मते मागितल्याबद्दल त्यांची खिल्ली उडवली आणि "तुम्हाला रावणसारखी १०० डोकी आहेत का?" असा प्रश्न केला. यानंतर भाजपने काँग्रेस पक्षावर जोरदार प्रहार केला. दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीदेखील खर्गे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
“त्यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे १३० कोटी भारतीयांचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांच्या हृदयात आहेत. जनतेला त्यांच्यावर केवळ विश्वासच नाही, तर श्रद्धाही आहे,” असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
दिल्लीत केजरीवालांवर निशाणाशिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सरड्याची उपमा दिली. राम मंदिराला विरोध केल्यानंतर आता ते श्रीरामाचा जाप करत असल्याचे ते म्हणाले. “केजरीवाल असे भस्मासूर आहेत ज्यांनी आपल्या गुरूचाच कबाडा केला. कोणालाही सोडलं नाही आणि पुढेही सोडणार नाहीत. ते सरड्यापेक्षाही वेगानं रंग बदलतात. आम आदमी पक्ष पोकळ प्रचार करतो. परंतु भाजप सेवा हाच विचार मानून काम करतो,” असं चौहान म्हणाले.
“केजरीवार करप्शन वॉल आणि किंग झाले आहेत. त्यांचा एक मंत्री जेलमध्ये मसाज करतोय आणि एक मंत्री मसाज करून जेलमध्ये जाण्याची तयारी करतोय. मद्याच्या घोटाळ्यापासून किती घोटाळे केजरीवालांनी केलेत हे दिल्लीकरांना माहित आहे. दिल्लीच्या जनतेचं जीवन प्रदुषणामुळे त्रासदायक होतंय,” असंही ते म्हणाले.