चेन्नई: देशात काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणुकीची चर्चा सुरू आहे. तब्बल दोन दशकानंतर काँग्रेसचे अध्यक्ष गांधी परिवारातील नसणार आहेत. या निवडणुकीसाठी खासदार शशी थरुर आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी अर्ज केले आहेत. शशी थरुर यांनी देशभरात दौरे सुरू केले आहेत. काल ते तमिळनाडू येथे दौऱ्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या बैठकीला अनेक प्रतिनिधींनी गैरहजेरी लावली, त्यामुळे आता थरुर यांना कमी प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे.
काल गुरुवारी शशी थरुर चेन्नईमध्ये उपस्थित होते, यावेळी त्यांनी ७०० प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलवले होते. यात फक्त १२ प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. ही बैठक पक्षाचे मुख्यालय सथियामूर्ती भवन येथे आयोजित केली होती.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी नागपुरातून खरगेंना पाठबळ
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात शशी थरुर निवडणूक लढवत आहेत. यातून अशोक गहलोत शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर शेवटच्या क्षणी खर्गे यांची एन्ट्री झाली आहे.
चेन्नईत काल शशी थरूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला."जर ते माझ्या बैठकीला उपस्थित राहण्यास घाबरत असतील तर ते त्यांचे नुकसान आहे" "गांधी कुटुंबाने स्पष्ट केले आहे की त्यांच्याकडे अधिकृत उमेदवार नाही. मल्लिकार्जुन खर्गे हे अधिकृत उमेदवार असल्याचा समज आम्ही दूर करू," असं शशी थरुर म्हणाले.
थरूर हे पहिलेच नेते आहेत, ज्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतरच त्यांनी ही घोषणा केली होती.
"सोनिया गांधी यांनीच त्यांना "निवडणूक लढण्यासाठी आपले स्वागत आहे" असे सांगितले होते. पक्षाकडे "अधिकृत उमेदवार" नसेल आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब तटस्थ राहील, असे सोनिया गांधी यांनी म्हटले होते, असंही थरूर म्हणाले.