नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षांतर्गत तयारी जोरात सुरू आहे. पक्षातील एका मोठ्या गटाला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अध्यक्षपदावर पाहायचे आहे. पण, या पदासाठी राहुल गांधी तयार नाहीत. जर राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष व्हायचे नसेल तर त्यांना फोर्स करू नका, पक्षात इतरही लोक आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे, असे विधान काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांनी केले आहे.
मध्य प्रदेशातील चंचोडा येथील आमदार लक्ष्मण सिंह यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केले. यावेळी लक्ष्मण सिंह म्हणाले की, "त्यांनी (राहुल) ही यात्रा याआधी करायला हवी होती. यामुळे लोकांना असे म्हणायची संधी मिळाली आहे की, ही यात्रा ईडीच्या छाप्यानंतरच का घेतली जात आहे?"
याचबरोबर, "पायी चालल्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कोणी पंतप्रधान होऊ शकत नाही. मेंढ्या पाळणारे रबाडी दरवर्षी 2 ते 3 हजार किलोमीटर पायी चालतात, तर तेही पंतप्रधान झाले असते. निवडणुकीच्या राजकारणात व्यवस्थापनाची कला असते, बूथ स्तरावर काम करून निवडणुका जिंकल्या जातात," असे म्हणत लक्ष्मण सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर एकप्रकारे निशाणा साधला.
काय म्हणाले होते राहुल गांधी?दरम्यान, राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होण्यासाठी नकारही दिला नाही किंवा होकार सुद्धा दिला नाही. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले होते की, "निवडणूक प्रक्रिया संपल्यावर तुम्हाला कळेल की, मी अध्यक्ष होतोय की नाही. जर मी उमेदवारी दाखल केली नाही तर तुम्ही प्रश्न विचारू शकता."
कधी होणार निवडणूक?काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या (Congress President Election) निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर रोजी नामांकन दाखल केले जाणार असून या उमेदवारी अर्जात एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे.