गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याच्यावरून शह काटशहाचे राजकारण सुरु होते. या सर्व राजकारणाची आचा फायनल ठरली आहे. काँग्रेस हायकमांडचे विश्वासून मल्लिकार्जून खर्गे यांच्याविरुद्ध काँग्रेसमधील दुसऱ्या गटाचे शशी थरूर असा हा सामना रंगणार आहे. तिसरे उमेदवार झारखंडचे माजी कॅबिनेट मंत्री के एन त्रिपाठी यांचा अर्ज रद्द झाला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे, यामुळे त्याच दिवशी निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र, तुर्तास तरी दोन्ही गट पाहता ही निवडणूक अटळ असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली आहे. यामध्ये 20 पैकी 4 फॉर्ममधील स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आल्याने ते नाकारण्यात आले आहेत. आता या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर आमनेसामने असतील, असे ते म्हणाले. या दोन्हीपैकी एकानेही अर्ज मागे न घेतल्यास निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरु केली जाईल, असेही ते म्हणाले.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. नामांकनाच्या शेवटच्या दिवशी झारखंडमधील काँग्रेस नेते केएन त्रिपाठी यांनीही शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह उमेदवारी दाखल केली होती. कृष्णानंद त्रिपाठी उर्फ केएन त्रिपाठी हे राजकारणात येण्यापूर्वी ते हवाई दलात होते. लष्कराची नोकरी सोडून राजकारणात आले. 2005 मध्ये डाल्टनगंजमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2009 मध्ये पुन्हा डाल्टनगंजमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर त्यांना राज्य सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री करण्यात आले. २०१४ मध्ये ते पुन्हा पराभूत झाले.