नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.काही दिवसातच अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे बोलले जात आहे.आजपासून या प्रक्रियेला सुरूवातही झाली. काँग्रेसच्या नाराज G-23 गटाकडून आतापर्यंत शशी थरुर अर्ज भरणार असल्याचे बोलले जात होते, पण आता या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, G-23 गटाने शशी थरुर यांच्या नावाला सहमती दिली नसल्याचे बोलले जात आहे. शशी थरुर यांच्या नावाचीही चर्चा झालेली नाही,तर मनीष तिवारी यांना उमेदवारी दिली जावू शकते, असं बोलले जात आहे.
Congress: राहुल गांधींचा नकार, आता या दोन दिग्गज नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक रंगणार
आतापर्यंत शशी थरुर आणि अशोक गहलोत यांच्या नावाची चर्चा होती, पण आता दिग्विजय सिंह यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. सिंह आज दिल्लीत येवून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते अध्यक्ष पदासाठी दावा करु शकतात. ते सध्या राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत असल्याचे बोलले जात आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची तारीख २४ ते ३० सप्टेंबर असणार आहे, तर अर्ज मागे घेण्याची तारीख ८ ऑक्टोंबर असणार आहे. १७ ऑक्टोंबरला मतदान तर १९ ऑक्टोंबरला निकाल घोषित करण्यात येणार आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांचेही नाव चर्चेत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले आहे की, अगोदर राहुल गांधी यांना उमेदवारीसाठी मनवायचा प्रयत्न करणार, त्यांनी ऐकले नाहीतर मी स्वत:अर्ज करणार असल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे.