Congress President Election : 22 वर्षांनंतर पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. शशी थरूर (Shashi Tharoor) आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे दोन ज्येष्ठ नेते या निवडणुकीत सहभागी झाले आहेत. देशातील सर्वात जुन्या पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी दोघेही आपापल्या घोषणापत्रांसह रिंगणात आहेत. दरम्यान, 'माझी तुलना शशी थरूर यांच्याशी करू नका,' असे खर्गे यांचे म्हणणे आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, माझी शशी थरूर यांच्याशी तुलना करू नका. पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याबाबत थरूर यांच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्यावर बोलताना खर्गे म्हणाले, मी स्वत: ब्लॉक अध्यक्षापासून सुरुवात करुन, इतक्या वरच्या पातळीवर आलो आहे. शशी थरूर तेव्हा कुठे होते? थरूर त्यांच्या जाहीरनाम्याचा पाठपुरावा करण्यास मोकळे आहेत. परंतू त्यांचा अजेंडा उदयपूरच्या जाहीरनाम्यात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचाच आहे, असा टोला खर्गेंनी लगावला.
तरुणांना संधी मिळेल का?
आपल्या जाहीरनाम्याविषयी बोलताना खर्गे म्हणतात की, सर्व वरिष्ठ नेते आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर त्या घोषणांचा विचार करण्यात आला आहे. आता फक्त त्यांची अंमलबजावणी करणे, हेच आमचे ध्येय आहे. काँग्रेसला बदल घडवून आणण्यासाठी आणि सध्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तरुण चेहऱ्याची गरज आहे का? या प्रश्नावर खर्गे म्हणाले की, काँग्रेसला आपल्या पक्षात कोण आहे, याची माहिती आहे. जिथे ज्याची गरज असेल, तिथे त्याला सांगितले जाईल.
शशी थरूर काय म्हणाले होते?शशी थरूर यांनी 7 ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांचा 10 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला. माध्यमांशी संवाद साधताना थरूर म्हणाले होते की, माझा उद्देश पक्षाचे पुनरुज्जीवन करणे, पक्षाला पुन्हा सक्रिय करणे, कार्यकर्त्यांना सशक्त करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे आणि लोकांच्या संपर्कात राहणे, हा आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपचा सामना करण्यासाठी राजकीयदृष्ट्या योग्य आहे, असेही ते म्हणाले होते.