नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होत आहे. शशी थरुर, दिग्विजय सिंह यांच्यानंतर आता पक्षातीत वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गेही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मल्लिकार्जुन खर्गे आज दुपारी १२.३० वाजता अर्ज दाखल करणार आहेत. दिग्विजय सिंह यांनी आज सकाळी मल्लिकार्जुन खर्गे यांची निवासस्थानी भेट घेतली.
सोनिया गांधी यांनी दिग्विजय सिंह यांना अर्ज पाठिमागे घेण्याचे संकेत दिल्यास ते मागे घेऊ शकतात असं बोलले जात आहे. दरम्यान, आज सकाळी दिग्विजय सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी चर्चा काय झाली याची माहिती अजुनही समोर आलेली नाही.
ठरलं! शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, 30 सप्टेंबरला अर्ज दाखल करणार
दुसरीकडे खासदार शशी थरुर यांनीही अर्ज दाखल केला आहे. आम्ही ही निवडणूक मैत्रिपूर्ण वातावरणात लढणार असल्याचे थरुर यांनी म्हटले आहे. आता अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अशोक गहलोत यांची माघार
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादादरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही. राजस्थानमध्ये जे काही घडलं, त्याचं मला दु:ख आहे. त्या प्रकारामुळे मला धक्का बसला आहे. त्यासाठी मी सोनिया गांधी यांची माफीही मागितली आहे, असे अशोक गहलोत यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांची भेट घेऊन आल्यानंतर अशोक गहलोत म्हणाले की, गेल्या ५० वर्षांपासून म्हणजेच इंदिरा गांधी यांच्या काळापासून मी काँग्रेसचा एक विश्वासपात्र सैनिक म्हणून काम केले आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून जी काही जबाबदारी दिली गेली, ती मी प्रामाणिकपणे निभावली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम".