Congress President Election, Shashi Tharoor: काँग्रेस पक्षाध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. त्यात केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यानंतर आता या पदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यातच चुरस पाहायला मिळणार आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे खासदार शशी थरूर म्हणाले यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणारा कोणताही नेता गांधी परिवाराबाबत पूर्णपणे आदर व्यक्त करेल. कारण काँग्रेस आणि गांधी परिवाराचा डीएनए एकच आहे, त्यामुळे कोणताही अध्यक्ष गांधी कुटुंबाचा निरोप घेणार नाही, असे ते म्हणाले.
पक्षाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरूवात होण्यात आधीच गांधी घराण्याच्या भूमिकेबद्दल शशी थरूर यांना विचारले असता ते म्हणाले, "गांधी कुटुंबाचा आणि काँग्रेसचा डीएनए एकच आहे... गांधी कुटुंबाला 'अलविदा' म्हणणारा कोणीही नसेल, कारण कोणताही अध्यक्ष इतका मूर्ख नाही. कारण गांधी कुटुंब आमच्यासाठी खूप मोठी संपत्ती आहेत..."
याशिवाय त्यांनी ट्विट करून स्वत:साठी आणि खर्गे यांच्यासाठी निवडणूक लढविण्याबाबतही मत मांडले. त्यांनी लिहिले की, "अर्जांच्या छाननीनंतर, अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि माझ्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल हे जाणून आनंद झाला. या लोकशाही प्रक्रियेचा काँग्रेस आणि आमच्या सर्व मित्रपक्षांना फायदा होवो!"
२० पैकी ४ अर्ज बाद
तीन नेत्यांनी शुक्रवारी एकूण २० फॉर्म भरले होते. त्यापैकी चार नाकारण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, खर्गे यांनी १४ अर्ज भरले होते, तर थरूर यांनी पाच आणि त्रिपाठी यांनी एक फॉर्म भरला होता. त्यात त्रिपाठी यांचा फॉर्म नाकारण्यात आला कारण त्यांच्या एका प्रस्तावकाची स्वाक्षरी जुळली नाही आणि दुसर्या प्रस्तावकाची स्वाक्षरी म्हणजे डुप्लिकेशन होते.
थरूर यांच्यावर खर्गे भारी पडणार?
खर्गे यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे ३० नेते समर्थक ठरले आहेत. तर थरूर यांच्या बाजूने केवळ ९ प्रस्तावक होते. खर्गे यांच्या समर्थकांमध्ये G-23 चे नेतेही आहेत. सोप्या शब्दात सांगायचे तर, सराव सामन्यात खर्गे यांनी थरूर यांना मागे टाकले. खर्गे यांच्या समर्थकांची संख्याही जास्त असल्याचे दिसले.