२२ वर्षांपूर्वी झाली होती काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, या नेत्याने दिले होते सोनिया गांधींना आव्हान, असा लागला होता निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 04:20 PM2022-09-22T16:20:51+5:302022-09-22T16:26:45+5:30
Congress: तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होणार आहे. यापूर्वी २००० साली काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवड झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांना जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. कशी होती ती निवडणूक जाणून घ्या.
नवी दिल्ली - काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. २४ सप्टेंबरपासून उमेदवारांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू होणार आहे. तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होणार आहे. यापूर्वी २००० साली काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवड झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांना जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. कशी होती ती निवडणूक जाणून घ्या.
२००० साली काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची दोन दशके पक्षामध्ये अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकीची प्रथा होती. मात्र इंदिरा गांधी यांच्यानंतर ही प्रथा संपुष्टात आली होती. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपद आणि काँग्रेसचं अध्यक्षपद एकत्रितपणे सांभाळलं होतं. तर राजीव गांधी यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले होते.
गेल्या ५ दशकांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी केवळ दोन वेळा निवडणूक झाली आहे. पहिल्यांदा १९९७ मध्ये सीताराम केसरी यांनी शरद पवार आणि राजेश पायलट यांना पराभूत केले होते. तर २००० मध्ये सोनिया गांधी यांनी जितेंद्र प्रसाद यांचा पराभव करून विजय मिळवला होता.
२००० साली जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली होती तेव्हा ही निवडणूक बिनविरोध होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २९ ऑक्टोबर रोजी जितेंद्र प्रसाद यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली होती. जितेंद्र प्रसाद यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी कमिटीने दबाव आणला होता. मात्र जितेंद्र प्रसाद आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
जितेंद्र प्रसाद यांनी श्रीपेराम्बदूर येथून आपल्या प्रचार अभियानाची सुरुवात केली होती. मात्र ते जेव्हा चेन्नईत पोहोचले तेव्हा तिथे त्यांच्या स्वागतासाठी कुणीही आले नव्हते. त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. यादरम्यान, त्यांनी निवडणुकीत गडबड होण्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र त्यांच्या आरोपांकडे कुणीही लक्ष दिले नव्हते.
या निवडणुकीसाठी भरघोस मतदान झाले होते. दरम्यान, या निवडणुकीत सोनिया गांधी जिंकून येणार हे निश्चित होते. मात्र जितेंद्र प्रसाद यांना किती मतं मिळणार त्याबाबत उत्सुकता होती. या मतमोजणीत सोनिया गांधी यांना तब्बल ७ हजार ४४८ मते मिळाली. तर जितेंद्र प्रसाद यांना केवळ ९४ मतांवर समाधान मानावे लागले.