Congress President Election: काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदासाठी होणाऱ्या लढतीत शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात थेट लढत होणार आहे. काँग्रेसकडून आणखी एका उमेदवाराने देखील अर्ज दाखल केला होता, पण काही तांत्रिक कारणांमुळे तो अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यामुळे आता थरूर विरूद्ध खर्गे असा सामना पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान, आपले प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानाचे समर्थन शशी थरूर यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी खर्गे यांच्या विधानाचे समर्थन दिले की, आम्हाला एकमेकांशी नाही तर भाजपविरुद्ध लढायचे आहे. ते म्हणाले की, खर्गे आणि माझ्यात वैचारिक फरक नाही, आम्ही सत्ताधारी भाजपशी लढताना एकत्र आहोत.
एका ट्विटमध्ये थरूर म्हणाले, "मी स्पष्टपणे सांगतो की मी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मताशी सहमत आहे की काँग्रेसमध्ये आपण सर्वांनी एकजूट होऊन भाजपचा सामना केला पाहिजे. आमच्यात वैचारिक मतभेद अजिबातच नाहीत. आम्ही एकाच विचारसरणीचे लोक आहोत. १७ ऑक्टोबरची निवडणूक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आमच्यात मतदानाने सारं ठरणार आहे." याआधी रविवारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, त्यांनी प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना एकमताने पक्षाध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्यास सांगितले होते, पण थरूर यांनीच खर्गेंना निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.
खर्गे यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेने केली. त्यावेळी ते म्हणाले की, आता कोणताही G-23 गट नाही. हा मीडियाने सुरू केलेला शब्द आहे. काँग्रेसवाल्यांना त्यांच्याशी देणे-घेणे नाही. आता सर्व नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधात एकजुटीने लढायचे आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत आहे. लोकसभेचे खासदार शशी थरूर यांनी सांगितले की ते उमेदवारांच्या कल्पनांना नक्कीच पक्षात वाव मिळेल आणि वादविवाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी पक्षाचा मंच नक्कीच खुला आहे कारण यामुळे पक्षामध्ये लोकांची आवड वाढेल. यूकेमध्ये अलीकडेच कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्व पदासाठी अशी बाब पाहायला मिळाली आहे, असेही ते म्हणाले.